गडचिरोलीच्या ग्रामीण भागातही भाजपची मुसंडी
By Admin | Updated: October 21, 2014 22:51 IST2014-10-21T22:51:28+5:302014-10-21T22:51:28+5:30
विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला गडचिरोली तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचंड मताधिक्य मिळाले आहे. पक्षाचाही एकही जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यात

गडचिरोलीच्या ग्रामीण भागातही भाजपची मुसंडी
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला गडचिरोली तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचंड मताधिक्य मिळाले आहे. पक्षाचाही एकही जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यात नसतांना भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात मारलेली मुसंडी निश्चितच मोठी आहे. भाजपच्या खालोखाल काँग्रेस पक्षानेही गडचिरोलीच्या ग्रामीण भागात चांगले मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे गडचिरोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांसाठी आता ही मताधिक्य दोन वर्षानंतर धोक्याची घंटा वाजविण्याची शक्यता आहे.
उल्लेखनिय बाब म्हणजे कोटगल-मुरखळा जि. प. क्षेत्राचे सदस्य केसरी पाटील उसेंडी हे स्वत: शिवसेनेकडून मैदानात असतांनाही त्यांच्या क्षेत्रात शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. गडचिरोली तालुक्यात कोटगल-मुरखळा, वसा-पोर्ला, जेप्रा-विहिरगाव, मौशिखांब-मुरमाडी, येवली-पोटेगाव हे पाच जिल्हा परिषद क्षेत्र आहे. यातील दोन क्षेत्रांमध्ये काँग्रेस, दोन क्षेत्रामध्ये अपक्ष तर एका क्षेत्रात युवाशक्ती आघाडीच्या बॅनरवर निवडून आलेल्या महिला सदस्य जि. प. मध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. कोटगल-मुरखळा क्षेत्रात भाजपला ३ हजार २०६, राष्ट्रवादी काँग्रेसला १ हजार २८२, शिवसेनेला १ हजार २१४, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ५५९ तर बहुजन समाज पक्षाला १ हजार ८२ मते मिळाली.
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती असलेले विश्वास भोवते यांच्या वसा-पोर्ला क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच वाताहात झाली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ८०६ मते मिळाली. भाजपला ३ हजार ५८०, शिवसेनेला १ हजार २६, काँग्रेसला ६३७ व बहुजन समाज पार्टीला ८०८ मते मिळाली. जेप्रा-विहिरगाव जि. प. क्षेत्रात भारतीय जनता पार्टीला २ हजार ७२१, राष्ट्रवादी काँग्रेसला ६५८, शिवसेनेला ५२४, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १ हजार ५० तर बहुजन समाज पार्टीला ८४२ मते मिळाली. मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय जनता पार्टीला ३ हजार ८९९, राष्ट्रवादी काँग्रेसला १ हजार १४४, शिवसेनेला ७७३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ९९५ तर बहुजन समाज पार्टीला ५९५ मते मिळाली. येवली-पोटेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ३ हजार ९७०, राष्ट्रवादी काँग्रेसला ६५५, शिवसेनेला १ हजार ६३०, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ९२७ तर बहुजन समाज पार्टीला ९०८ मते मिळाली. (शहर प्रतिनिधी)