गडचिरोलीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा
By Admin | Updated: September 4, 2015 01:16 IST2015-09-04T01:16:07+5:302015-09-04T01:16:07+5:30
येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष निर्मला मडके यांच्यावर त्यांच्याच गटाच्या नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर गुरूवारी मडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला, ....

गडचिरोलीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा
गडचिरोली : येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष निर्मला मडके यांच्यावर त्यांच्याच गटाच्या नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर गुरूवारी मडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला, अशी माहिती नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी लोकमतला दिली आहे.
या संदर्भात नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी सांगितले की, आपण सगळ्यांना माहितच आहे, नुकताच माझ्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. मी ‘लोकमत’ला जेव्हा माझे पहिले स्टेटमेंट दिले, त्या वेळी मला या सव्वा सव्वा वर्षांच्या कालावधीची कोणतीही पूर्व कल्पना नव्हती आणि या एक वर्षात त्या विषयी आपसात कोणतीही चर्चा झाली नाही. लोकमतमध्ये प्रकाशित माझ्या स्टेटमेंट बद्दल माहिती होताच माझे पती दीपक मडके यांनी मला या विषयाबाबत सुचित केले. आमचे गट नेते प्रा. राजेश कात्रटवार यांच्या शब्दाबाहेर आम्ही कधी नव्हतोच. म्हणून त्यांनी राजीनामा मागताच माझे पती दीपक मडके यांनी आपल्या स्टेटमेंटद्वारे राजीनामा देण्यास आपली संमती दर्शविली. मला नुकतेच नगराध्यक्ष पदभार सांभाळता एक वर्ष एक महिना १४ दिवस पूर्ण झालेत. तरीही गटनेत्यांचे आदेश असल्याने आपण सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ३ सप्टेंबर रोजी बुधवारला राजीनामा दिला. मी आशा करतो की, माझ्या कारकिर्दीत शहराच्या हितासंबंधी जी काही थोडीफार कामे झालीत, उदा. वारंगणा वस्ती हटविण्यात आली तसेच शहरातील विविध विकास कामे व शहराला व्यसनमुक्त करण्याची कामे नवीन येणाऱ्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून होतील अशी अपेक्षा करतो, असेही मडके यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)