‘दीपोत्सव’चे गडचिरोलीत थाटात लोकार्पण

By Admin | Updated: November 6, 2015 02:31 IST2015-11-06T02:31:24+5:302015-11-06T02:31:24+5:30

मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते, अशा लोकमत ‘दीपोत्सव’ अंकाचा लोकार्पण

Gadchiroli's release of 'Deepotsav' | ‘दीपोत्सव’चे गडचिरोलीत थाटात लोकार्पण

‘दीपोत्सव’चे गडचिरोलीत थाटात लोकार्पण

गडचिरोली : मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते, अशा लोकमत ‘दीपोत्सव’ अंकाचा लोकार्पण सोहळा गुरूवारी गडचिरोली येथे लोकमत जिल्हा कार्यालयात थाटात पार पडला.
छोटेखानी लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत अप्पलवार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमतचे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने विमोचन सोहळ्याची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन यांनी केले. त्यांनी ‘दीपोत्सव’ लोकार्पण सोहळ्याची भूमिका विशद केली. या कार्यक्रमात बोलताना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी म्हटले की, लोकमत ही अशी संस्था आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला सातत्याने टिकवून तिला चालना देण्याचे कार्य करीत आहे. नावीण्यपूर्णता, प्रयोगशिलता व अद्ययावतपणा हे लोकमतचे खास वैशिष्ट्य आहे. लोकमतच्या दिवाळी अंकाची लोक वर्षापासून प्रतीक्षा करीत असतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक म्हणाल्या की, स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या बाबूजींनी लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. मी बालपणापासून लोकमतची नियमित वाचक आहे. जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून या वृत्तपत्राने महाराष्ट्रात लौकिक मिळविला आहे. विविध मंचच्या माध्यमातून बालक, युवक, व महिलांना दिशा देण्याचे काम महाराष्ट्रात सुरू आहे, असा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. दिवाळी अंकाच्या माध्यमातून सर्व साहित्यिकांचे साहित्य जनमाणसापर्यंत पोहोचविण्याचे काम लोकमत सातत्याने करीत आहे. खरी लोकजागृती व लोकमतांचा आदर करण्याचे काम या वर्तमानपत्राने निरंतरपणे केलेले आहे. सध्या देशाची परिस्थिती पाहता, लोकमतकडे या देशाची सहिष्णुता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आलेली आहे, असे प्रतिपादन माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सुरेश पोरेड्डीवार म्हणाले, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या स्पर्धेतही मुद्रीत माध्यम टिकून आहेत. लोकमतची नाळ ग्रामीण माणसाशी जुळलेली असल्याने त्यांना खेड्यापाड्यांपासून राष्ट्रीय पातळीपर्यंतची खडान्खडा माहिती असते. कुणाचीही मुलाहिजा न बाळगता परखडपणे मत मांडण्याचे काम लोकमतने निर्भिडपणे केले आहे, असेही ते म्हणाले. सोहळ्यात डॉ. हेमंत अप्पलवार, हसनअली गिलानी यांनीही लोकमतच्या विविध उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख करून ‘दीपोत्सव’ला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा पडघन यांनी तर आभार प्रदर्शन लोकमत जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे यांनी मानले. यावेळी तालुका प्रतिनिधी, गडचिरोली येथील प्रमुख वितरक, लोकमत कार्यालयातील सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Web Title: Gadchiroli's release of 'Deepotsav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.