गडचिरोलीचे हत्ती जाणार गुजरातच्या ‘अंबानी झू’ मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 17:29 IST2022-01-09T08:28:00+5:302022-01-10T17:29:57+5:30
एका खासगी प्राणिसंग्रहालयाची शान वाढविण्यासाठी ही अनमोल सरकारी मालमत्ता देण्याच्या या खटाटोपाबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

गडचिरोलीचे हत्ती जाणार गुजरातच्या ‘अंबानी झू’ मध्ये
मनोज ताजने
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : संपूर्ण राज्यभरात हत्तींना पाहण्यासाठी एकमेव आकर्षण असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात आले आहे; कारण कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून सात हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत. एका खासगी प्राणिसंग्रहालयाची शान वाढविण्यासाठी ही अनमोल सरकारी मालमत्ता देण्याच्या या खटाटोपाबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुजरातच्या जामनगर भागात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देशातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय उभारले जात आहे. या खासगी प्राणिसंग्रहालयासाठी देशभरातून विविध वन्यप्राणी मागविले जात आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून अनेक ठिकाणचे दुर्मीळ प्राणी या प्राणिसंग्रहालयासाठी देण्याची अनुमतीही दिली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या ताब्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधून ७ पैकी ४ हत्ती, तर आलापल्लीतील ३ हत्ती गुजरातला पाठविले जाणार आहेत.
राज्य सरकारची उदासीनता
कमलापूरमधील हत्तींच्या पालनपोषणासाठी राज्य सरकारकडून वेळेवर निधी मिळत नाही. हत्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, पशुवैद्यकीय अधिकारीही नाही. गेल्या दोन वर्षांत या कॅम्पमधील तीन हत्तींची पिले आजारांनी मरण पावली. राज्यात एकमेव असलेल्या या हत्ती कॅम्पकडे सरकारने लक्ष दिल्यास गडचिरोलीतील पर्यटन वाढून रोजगारनिर्मिती होऊ शकते.