गडचिरोलीत रेमडेसिविरच्या काळाबाजाराला संधीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:38 IST2021-04-22T04:38:07+5:302021-04-22T04:38:07+5:30
जिल्ह्यात एकाही खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे संपूर्ण उपचार केवळ सरकारी रुग्णालयातच सुरू आहेत. ...

गडचिरोलीत रेमडेसिविरच्या काळाबाजाराला संधीच नाही
जिल्ह्यात एकाही खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे संपूर्ण उपचार केवळ सरकारी रुग्णालयातच सुरू आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन देण्यापूर्वी रुग्णाच्या कुटुंबीयांची संमती घेणे बंधनकारक आहे. गडचिराेली जिल्ह्यात काेणत्याही खासगी रुग्णालयात काेराेना रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व इतर शासकीय काेविड केअर सेंटरवर रुग्णांवर औषधाेपचार केला जात आहे.
रेमडेसिविरमध्ये विविध कंपन्यांच्या इंजेक्शनचा समावेश आहे. यामध्ये कॅडिला, सिल्जिन इंटरनॅशनल, डाॅ. रेड्डीज, सिपला, मायलॅन, ज्युबिलंट, हेटेराे आदींचा समावेश आहे. यापैकी गडचिराेली व देसाईगंज शहरात सिपला व हेटेराे या दोनच कंपन्यांचे इंजेक्शन उपलब्ध हाेत आहेत. पूर्वी १०० एमजीच्या या सिपला कंपनीच्या इंजेक्शनची किंमत चार हजार रुपये हाेती. केंद्र सरकारने या इंजेक्शनची किंमत कमी केली असून ते आता तीन हजार रुपयांना विक्री करता येणार आहे. हा बाजारभाव आहे. गडचिराेली शहर व जिल्ह्यात काेणत्याही खासगी मेडिकल दुकान व एजन्सीमध्ये वैयक्तिक रुग्णांसाठी व खासगी दवाखान्यांसाठी हे इंजेक्शन पुरविले जात नाही. तसेच विकलेही जात नसल्याची माहिती येथील एका मेडिकल एजन्सीधारकाने दिली आहे.
बाॅक्स ...
कंपनीच्या किमतीनुसार इंजेक्शन उपलब्ध
काेराेना रूग्णांसाठी उपचारादरम्यान आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा कंपनीच्या किमतीनुसार शासकीय रुग्णालयाला केला जात आहे. सिप्ला या इंजेक्शनचा एमआरपी रेट अर्थात बाजारमूल्य तीन हजार रूपये आहे. मात्र येथील मेडिकल एजन्सीधारक शासकीय रुग्णालयाला केवळ १,५४२ रुपयांमध्ये सिपला कंपनीचे इंजेक्शन उपलब्ध करून देत आहेत. १३७५ अधिक जीएसटी मिळून १५४२ रुपयांना या इंजेक्शनचा पुरवठा हाेत आहे.