गडचिरोली आकाशवाणी केंद्राचा प्रस्ताव रखडला
By Admin | Updated: March 25, 2015 01:44 IST2015-03-25T01:44:41+5:302015-03-25T01:44:41+5:30
देशाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत रेडीओ नेटवर्क पोहोचलेले आहे. विशेषत: देशातील नक्षलप्रभावित भागात ज्या ठिकाणी अद्याप दूरचित्रवाणी प्रसारण पोहोचलेले नाही,

गडचिरोली आकाशवाणी केंद्राचा प्रस्ताव रखडला
गडचिरोली : देशाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत रेडीओ नेटवर्क पोहोचलेले आहे. विशेषत: देशातील नक्षलप्रभावित भागात ज्या ठिकाणी अद्याप दूरचित्रवाणी प्रसारण पोहोचलेले नाही, अशा भागातही रेडीओ प्रसारण ऐकले जाते. हीच बाब लक्षात घेऊन गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आकाशवाणी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केला होता. मात्र अद्याप या प्रस्तावावर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गडचिरोली येथे होणारे आकाशवाणी केंद्र सध्या रखडलेले आहे.
युपीए दोन सरकारच्या काळात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी लोकसभेत गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी गोंडी भाषेतून प्रसारण असलेले आकाशवाणी केंद्र सुरू केले जाणार आहे, असे सुतोवात केले होते. गडचिरोली जिल्ह्यात आकाशवाणी केंद्र नसल्याने शासनाच्या अनेक योजना दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. तसेच गडचिरोली जिल्ह्यात अनेक गावांत वीज नसल्याने स्ट्रँझीस्टर वापरले जातात, असे सरकारच्या निदर्शनास आल्याने केंद्र सरकारने हे पाऊल उचलले होते. २००९ नंतर गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या फौजा दाखल झाल्यानंतर त्यांच्या सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमातून जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावात नागरिकांना रेडीओ संच वाटप करण्याचेही काम करण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी आकाशवाणी केंद्र गडचिरोली येथे सुरू केले जाईल, अशी माहितीही दिली होती. सध्या गडचिरोली येथे एफएम रेडीओ स्टेशनचे कार्यक्रम सर्वसामान्य श्रोते ऐकतात. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पुढाकारानंतरही गडचिरोली जिल्ह्यात अजुनपर्यंत आकाशवाणी केंद्र स्थापण्याबाबत काहीही हालचाली करण्यात आलेल्या नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आकाशवाणीच्या सहाय्यानेच देशातील लोकांशी संवाद साधत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथील आकाशवाणी केंद्राचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.