गडचिरोली एसटी विभाग मालामाल
By Admin | Updated: March 8, 2017 02:08 IST2017-03-08T02:08:04+5:302017-03-08T02:08:04+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव व आष्टी परिसरातील चपराळा तसेच व्यंकटापूर येथे

गडचिरोली एसटी विभाग मालामाल
मार्कंडा, चपराळा यात्रेतून २३ लाख ३७ हजार रूपयांचे उत्पन्न
दिलीप दहेलकर गडचिरोली
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव व आष्टी परिसरातील चपराळा तसेच व्यंकटापूर येथे महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेदरम्यान भाविकांसाठी गडचिरोली एसटी विभागामार्फत एकूण ५८ बसगाड्या यात्रा स्पेशल म्हणून सोडण्यात आल्या होत्या. या बसगाड्याच्या माध्यमातून गडचिरोलीच्या एसटी विभागाला एकूण २३ लाख ३७ हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मार्कंडादेव यात्रेदरम्यान भाविकांची वाहतुक सुविधेसाठी गैरसोय होऊ नये, या उद्देशाने एसटीचे विभाग नियंत्रक व्ही. टी. गव्हाळे यांच्या मार्गदर्शनात विभागीय वाहतूक अधिकारी एन. एस. बेलसरे, गडचिरोली आगार व्यवस्थापक व्ही. एल. बावणे, बसस्थानक प्रमुख पी. एस. सालोटकर, एस. ए. चौधरी यांनी या स्पेशल बसफेऱ्यांचे नियोजन केले. याशिवाय गडचिरोली आगारातर्फे मार्र्कंडादेव व साखरी घाट येथे तात्पुरते बसस्थानकही उभारण्यात आले होते. मार्र्कंडा व चपराळा यात्रेसाठी गडचिरोली आगाराच्या ३१, अहेरी आगारातर्फे १२ व ब्रह्मपुरी आगारातर्फे १५ अशा एकूण ५८ बसगाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय कार्यालयामार्फत सोडण्यात आल्या. या ५८ बसगाड्यांच्या २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत अनेक बसफेऱ्या यात्रेकरूंसाठी सोडण्यात आल्या.
यात्रा स्पेशलमधून अहेरी आगाराला ४ लाख ९९ हजार ५०१ रूपये, गडचिरोली आगाराला १६ लाख ४२ हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. तसेच ब्रह्मपुरी आगाराला ६ लाख ९४ हजार ४८९ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात्रा स्पेशल बसफेऱ्यांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी एसटीच्या विभागीय कार्यालयातर्फे मार्र्कंडादेव येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा नेहमी तोट्यात राहत असते. मात्र महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी भरणाऱ्या जत्रा तसेच जि. प., प.स व अन्य निवडणुकांच्या माध्यमातून निवडणूक व पोलीस विभागातर्फे लाखो रूपयांचे उत्पन्न एसटीला मिळत असते. त्यामुळे तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला अशा स्पेशल बसफेऱ्यांमधून आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळतो. विशेष म्हणजे, महाशिवरात्री यात्रा व निवडणूक काळात बसफेऱ्यांवर परिणाम होऊ नये, याकरिता चालक व वाहकांच्या रजा रद्द करण्यात आल्या होत्या.
जि. प. निवडणुकीतून अहेरी आगारालाही सात लाखांचे उत्पन्न
दुसऱ्या टप्प्यात अहेरी उपविभागातील चार तालुक्यात जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या कामासाठी अहेरीच्या तहसील कार्यालयाने अहेरी आगाराच्या २४ व पोलीस प्रशासनाने पाच अशा एकूण २९ बसगाड्या अधिग्रहीत केल्या होत्या. या बसगाड्याच्या माध्यमातून अहेरी आगाराला ७ लाख ७० हजार ९०५ रूपये इतके उत्पन्न प्राप्त होणार असल्याची माहिती अहेरीचे आगार व्यवस्थापक घागरगुंडे यांनी दिली आहे.
जि.प. निवडणुकीतून ३२ लाख मिळाले
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता पोलिंग पाट्या व पोलीस जवानांना मतदान केंद्रस्थळी नेण्याकरिता गडचिरोली आगाराच्या १०४ बसगाड्या अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. देसाईगंज, आरमोरी, धानोरा, कुरखेडा, चामोर्शी व सावली या सहा तहसील कार्यालय प्रशासनातर्फे गडचिरोली आगाराच्या एकूण ८० बसगाड्या अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस विभागाने गडचिरोली आगाराच्या २४ बसगाड्या अधिग्रहीत केल्या होत्या. दोन्ही विभागाच्या बसगाडया मिळून एकूण ३२ लाख रूपयांचे उत्पन्न गडचिरोली एसटी आगाराला प्राप्त झाले आहे.
५३ हजार किमी अंतर बसगाड्या धावल्या
राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालय गडचिरोलीच्या वतीने अहेरी, ब्रह्मपुरी व गडचिरोली आगाराच्या मिळून एकुण ५८ बसगाड्या मार्र्कंडा व चपराळा यात्रा स्पेशल म्हणून लावण्यात आल्या होत्या. सदर बसगाड्या यात्रेदरम्यान एकूण ५३ हजार ८२४ किमी अंतर विविध मार्गावर धावल्या.