गडचिरोलीत सॉमिल जळून खाक
By Admin | Updated: November 16, 2016 02:00 IST2016-11-16T02:00:33+5:302016-11-16T02:00:33+5:30
येथील आरमोरी मार्गावरील राजूरकर यांच्या आरामशिनला सोमवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.

गडचिरोलीत सॉमिल जळून खाक
जवळपास सात लाखांचे नुकसान : सोमवारच्या रात्रीची घटना; कारण गुलदस्त्यात
गडचिरोली : येथील आरमोरी मार्गावरील राजूरकर यांच्या आरामशिनला सोमवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आरामशिन व सागवान लाकडे जळून खाक झाल्याने जळपास सात लाख रूपयांचे नुकसान झाले.
आरमोरी मार्गावर राजूरकर यांच्या मालकीचे उमाकांत सॉ मिल आहे. सध्या हे सॉ मिल कोल्हे यांना चालविण्यासाठी भाड्याने देण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास आरामशिन असलेल्या ठिकाणी आग लागली. राजूरकर यांचे घर आरामशिनच्या बाजुलाच आहे. या आरामशिनच्या घरावरूनच राजूरकर यांच्या घराला वीज पुरवठा करणाऱ्या वायर गेला आहे. आग लागताच घरातील वीज पुरवठा बंद झाला. त्यामुळे राजूरकर कुटुंबिय बाहेर निघाले असता, आरामशिनला आग लागल्याचे दिसून आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.
याबाबतची माहिती तत्काळ गडचिरोली येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने आग आटोक्यात येण्यास अडचण येत होती. एका अग्निशमन दलाच्या वाहनाने आग विझविणे शक्य नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर गडचिरोली येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी देसाईगंज येथीलही वाहन बोलविण्याचा सल्ला दिला. गडचिरोली व देसाईगंज येथील दोन्ही वाहनांनी मिळून सुमारे नऊ टँकर पाणी टाकले. पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आली.
या आगीत आरामशिनचे साहित्य, जवळपासची लाकडे जळून खाक झाली. आरामशिनचे छतही कोसळले. पहाटेला फिरायला जाणाऱ्या नागरिकांना ही घटना माहित होताच सकाळी जळलेली आरामशिन पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. आरामशिनच्या बाजुलाच दोन जेसीबी मशीन उभ्या होत्या. आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबतची तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)