बॉम्बच्या भीतीने गडचिरोलीत खळबळ
By Admin | Updated: August 12, 2016 00:43 IST2016-08-12T00:43:32+5:302016-08-12T00:43:32+5:30
सकाळी ११.३० वाजताची वेळ. गडचिरोली शहरातून शाळेसाठी निघालेले विद्यार्थी, पाच किमी अंतरावर कॉम्प्लेक्स परिसरात आॅफीस पकडण्यासाठी...

बॉम्बच्या भीतीने गडचिरोलीत खळबळ
अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ वाहतूक ठप्प : सुटकेसमध्ये स्फोटक नसल्याचे झाले निष्पन्न
गडचिरोली : सकाळी ११.३० वाजताची वेळ. गडचिरोली शहरातून शाळेसाठी निघालेले विद्यार्थी, पाच किमी अंतरावर कॉम्प्लेक्स परिसरात आॅफीस पकडण्यासाठी लगबगीने निघालेले पुरूष व महिला कर्मचारी अशा स्थितीतीच शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असताना गडचिरोली शहराचा मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात बेवारस स्थितीत सुटकेस असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बीडीडीएस पथकाने तत्काळ चौकाचा ताबा घेऊन सुटकेस आपल्या ताब्यात घेतली व निर्जनस्थळी नेऊन ही सुटकेस उघडली. त्यात काहीही नसल्याचे निष्पन्न झाले व गडचिरोलीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
इंदिरा गांधी चौकात बेवारस सुटकेस असल्याची माहिती मिळताच तत्काळ पोलीस विभागाची सारी यंत्रणा कामाला लागली. छत्तीसगडकडे जाणाऱ्या धानोरा, चामोर्शी, नागपूर, चंद्रपूर मार्गावरची वाहतूक तत्काळ थांबविण्यात आली. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास हा थरार चालला. त्यानंतर पोलीस विभागाचे बीडीडीएस पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधपथकाचे शेकडो कर्मचारी या कामी लागलेत. दोन पथदिव्यांना दोरी बांधण्यात आली. नंतर या दोरीच्या सहाय्यानेच सुटकेस पोलिसांच्या टेम्पो वाहनामध्ये अलगद उचलून टाकण्यात आली. तोपर्यंत संपूर्ण उपस्थितांच्या छातीचे ठोके धडधडत होते. गडचिरोलीत बॉम्ब आढळला, बॉम्ब कुणी ठेवला असेल, अशा चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडिया, व्हॉटस्अपवरून घटनास्थळाचे फोटोही पाठविण्यास उत्साही लोकांनी सुरूवात केली. ही बातमी राज्याच्या कानाकोपऱ्यात हवेसारखी पसरली. अखेरीस बीडीडीएस पथकाने निर्जनस्थळी नेऊन ही सुटकेस उघडली. त्यामध्ये काहीही मिळून आले नाही, अशी माहिती पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी तेजस्वीनी पाटील यांनी दुपारीच दिली. या घटनेमुळे गडचिरोलीसह राज्याच्या विविध भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना पेव फुटले होते. त्यानंतर तत्काळ पोलीस विभागाने सदर माहिती जाहीर केली. सुटकेस हस्तगत केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मात्र दिवसभर या घटनेची चर्चा होती. लोकमत कार्यालयातही अनेक जण विदर्भातून या घटनेबाबत विचारणा करीत होते. अफवांचा बाजार दिवसभर चालला. मात्र एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित असतानाही सुटकेस कुणी आणून ठेवली असावी, हा अतिशय गंभीरच विषय आहे. (नगर प्रतिनिधी)