गडचिरोलीची रेल्वे कागदावरच
By Admin | Updated: January 31, 2015 01:40 IST2015-01-31T01:40:41+5:302015-01-31T01:40:41+5:30
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण ब्रिटीश काळात करण्यात आले होते.

गडचिरोलीची रेल्वे कागदावरच
अभिनय खोपडे गडचिरोली
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण ब्रिटीश काळात करण्यात आले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर या रेल्वे मार्गाचाही प्रश्न रखडून आहे. तसेच या जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती लक्षात घेऊन जमशेटजी टाटा यांनी रेल्वे मार्ग टाकण्याची तयारी दाखविली होती. मात्र राजकीय विरोधामुळे ही मागणी पूर्ण होवू शकली नाही. जिल्ह्यात जवळजवळ वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासह आणखी चार ते पाच प्रकल्प लोहमार्गाचे प्रलंबित आहे. नव्या केंद्र व राज्य सरकारने या भागातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांसाठी विशेष निधीची तरतूद करून हे प्रकल्प मार्गी लावावेत, अशी मागणी आहे. मात्र राज्य सरकार वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी केंद्रसरकारने अधिक निधी आधी द्यावा. त्यानंतर आम्ही निधी देऊ अशी भूमिका घेऊन आहे. सध्या दोन्ही सरकारची आर्थिक परिस्थिती पाहू जाता गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्प कागदावरच राहण्याची दाट शक्यता आहे.
गडचिरोली हा पूर्वीचा चंद्रपूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग होता. तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्यात वडसा (देसाईगंज) हे मोठे गाव होते. देसाईगंज ही व्यावसायिक बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होती. इंग्रजांचा या भागात व्यावसायिक दृष्टिकोनातून संपर्क होता. इंग्रजकालीन अधिकारी येथे वास्तव्याला होते. या भागातील माल रेल्वेने वाहून नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी रेल्वे मार्गाचे जाळे विकसित केले होते. चांदा फोर्ट ते गोंदिया हा रेल्वे मार्ग इंग्रजांनीच तयार केला. या भागातील माल मध्यप्रदेशात नेता यावा, म्हणून ब्रिटिशांनी वडसा-रांगी-येरकड-मुरूमगाव-भिलाई या रेल्वे मार्गाचेही सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या अनेक खुणा धानोरा तालुक्यातील जांगदा गाव परिसरात आहेत, अशी माहिती या भागातील वयोवृद्ध देतात.
इंग्रजांनी सर्वेक्षणानंतर या भागात मोठे दगड गाडून त्याच्या सीमारेषा निश्चित केल्या होत्या. परंतु स्वातंत्र्यानंतर हा रेल्वे मार्ग मार्गी लागू शकला नाही.
भिलाई येथे पोलाद प्रकल्प उभा झाला. गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडीवर उच्च प्रतिचे लोहखनिज आहे. या खनिजाचा वापर व्हावा, म्हणून जमशेटजी टाटा यांनी येथून चंद्रपुरसाठी रेल्वे मार्ग टाकण्याची तयारी दर्शविली होती. १९३१ च्या सुमारास या कामाचे टाटा यांच्यामार्फत सर्वेक्षणही झाले होते, अशी माहिती आहे. काही राजकीय घराण्यांनी या कामाला विरोध केला. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण होण्यात प्रचंड अडथळे आलेत. इंग्रजी सत्तेनंतरही सरकारने रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण करण्यात गडचिरोली जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीतही तीन रेल्वे मार्ग जिल्ह्यातच प्रलंबित आहेत. ज्याची ब्रिटीशकाळात नोंद होती.