गडचिरोली पं. स. ची आमसभा ठरली वादळी
By Admin | Updated: March 6, 2016 00:56 IST2016-03-06T00:56:41+5:302016-03-06T00:56:41+5:30
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा पं. स. च्या परिसरात शनिवारी पार पडली.

गडचिरोली पं. स. ची आमसभा ठरली वादळी
कामाची गती वाढवा : घरकूल, रोहयोची थकीत मजुरी, पाणी योजना, विद्युतीकरण मुद्दे गाजले
गडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा पं. स. च्या परिसरात शनिवारी पार पडली. घरकुलाचे प्रलंबित प्रस्ताव, रोजगार हमी योजनेची थकीत मजुरी, बंद स्थितीत असलेल्या पाणीपुरवठा योजना, रखडलेले विद्युतीकरण, प्रलंबित वनहक्क पट्ट्याचे प्रस्ताव आदींसह विविध मुद्यांवर सदर सभा प्रचंड वादळी ठरली. विशेष म्हणजे या सभेत अनेक सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेचा लेटलतीफपणा व गैरव्यवहाराचा आमदारांपुढे पाढा वाचला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामाची गती वाढवावी, असे निर्देश आ. डॉ. होळी यांनी यावेळी दिले.
या वार्षिक आढावा सभेला मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पं. स. चे सभापती देवेंद्र भांडेकर, उपसभापती किशोर गद्देकार, जि. प. सदस्य छाया कुंभारे, जगन्नाथ बोरकुटे, प्रशांत वाघरे, पं. स. सदस्य सविता कावळे, बांबोळे, संवर्ग विकास अधिकारी विजय पचारे, तहसीलदार डी. भोयर आदी उपस्थित होते. या सभेत वाकडी ग्रा. पं. चे सरपंच बोरकुटे यांनी वन विभागाच्या १९ हेक्टर जागेवर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. वन विभाग तसेच भूमीअभिलेख विभागाने येथे असलेल्या वन तलावाच्या जागेचे सिमांकन केले नाही. परिणामी वनहक्काच्या नावाखाली मसेलीच्या नागरिकांनी अतिक्रमण केले, संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वनहक्क पट्ट्याचा प्रस्ताव सादर करून ते मंजूर करून घेतले. त्यामुळे वाकडी गावासाठी गायरानची जागा उरली नाही, शेतकऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा नाही, असे सांगितले. यावर सदर समस्येकडे अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वाकडीवासीयांना न्याय देण्याचे निर्देश आमदारांनी दिले. इंदिरा आवास योजनेंतर्गत वाकडी गावात ११० घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र पाच घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. सदर घरकूल कुठे गेले, असा प्रश्न सरपंच बोरकुटे यांनी उपस्थित करून आमदारांचे लक्ष वेधले.
कोटगल गावात १२ वीज खांब मंजूर करण्यात आले. मात्र ते अद्यापही लावण्यात आले नाही, असा मुद्दा कोटगलच्या सरपंचांनी उपस्थित केला. कोटगलची पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे, असेही सरपंचांनी यावेळी सांगितले. जुन्या कंत्राटदारावर कारवाई करून नवीन कंत्राटदारांकडून तत्काळ पाणी योजनेचे काम पूर्ण करावे, असे निर्देश आमदार डॉ. होळी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. येवली गावात एकूण २८३ घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र पहिल्या हप्त्याचे अनुदान न मिळाल्यामुळे ११६ घरकुलांचे काम थांबले आहे, असा मुद्दा तेथील सरपंचांनी सभेत मांडला. यावर बीडीओ पचारे यांनी आॅनलाईन प्रक्रिया असून शासनाकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम दिली जात आहे. यात तांत्रिक अडचणी आहेत, असे सांगितले. या सभेत सिंचन, आरोग्य, शिक्षण, बांधकाम आदी विषयावरील मुद्दे गाजले. सभेचे संचालन पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)