गडचिरोली नगर पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार
By Admin | Updated: June 15, 2016 02:04 IST2016-06-15T02:04:15+5:302016-06-15T02:04:15+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये होणार आहे.

गडचिरोली नगर पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार
गडचिरोली : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी वापरली जाणार आहे, अशी माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी विधानसभा मतदार संघाची मतदार यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली शहरातील मतदारांनी आपल्या नावाची नोंद गडचिरोली विधानसभा निवडणूक मतदार यादीत आहे किंवा नाही याबाबतची खात्री निवडणूक विभाग तहसील कार्यालय गडचिरोली येथे तपासून करावी, असेही मुख्याधिकारी निपाणे यांनी म्हटले आहे. राजकीय पक्षांकडूनही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
नवमतदारांची नोंदणी होणार
गडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येत आहे. ज्यांची नावे मतदार यादीत नाही तसेच नोंदणी न केलेल्या मतदारांनी निवडणूक विभाग तहसील कार्यालय गडचिरोली व मतदान केंद्रस्त अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी निपाणे यांनी केले आहे.