खंजेरी भजनाच्या नादमय स्वरांनी गडचिरोलीकर मंत्रमुग्ध
By Admin | Updated: January 25, 2016 01:45 IST2016-01-25T01:45:42+5:302016-01-25T01:45:42+5:30
नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळ व जनजागृती गणेश मंडळ गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने येथील कमल-केशव सभागृहात

खंजेरी भजनाच्या नादमय स्वरांनी गडचिरोलीकर मंत्रमुग्ध
गडचिरोली : नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळ व जनजागृती गणेश मंडळ गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने येथील कमल-केशव सभागृहात शनिवारपासून विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. शनिवारपासून तर आज सायंकाळपर्यंत यवतमाळ, अमरावती, वाशिम, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील १४ भजन मंडळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत भजन मंडळांनी सादर केलेल्या खंजेरी भजनाच्या नादमय स्वरांनी गडचिरोलीकर मंत्रमुग्ध झाले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या १४ मंडळांमध्ये नऊ पुरूष भजन मंडळ, चार महिला भजन मंडळ व एका बाल भजन मंडळाचा समावेश आहे. या १४ भजन मंडळांनी स्पर्धेतील अटी व नियमानुसार देशभक्तीवर दोन तर व्यसनमुक्ती, अध्यात्म व गवळण असे पाच भजन सादर केले. एका भजन मंडळात पाच लोक व दोन वाजंत्री असा सात लोकांचा समुह होता.
यावेळी सहभागी झालेल्या भजन मंडळांनी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संदेशावर तसेच व्यसनमुक्ती, स्वच्छता अध्यात्म व देशभक्तीपर उत्कृष्ट भजन सादर केले. या भजन स्पर्धेमुळे चामोर्शी मार्गावरील परिसर भक्तीमय झाला. रविवारी रात्री ७ वाजता नागपूर येथील बाल कीर्तनकार गौरी विठोले यांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. यावेळी गडचिरोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व त्यापुढील क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या भजन मंडळींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख, पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)