गडचिरोलीतील मुख्य मार्ग खड्ड्यात
By Admin | Updated: September 14, 2015 01:14 IST2015-09-14T01:14:00+5:302015-09-14T01:14:00+5:30
शहरातील आरमोरी, चामोर्शी, धानोरा व मूल या चारही मुख्य मार्गांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

गडचिरोलीतील मुख्य मार्ग खड्ड्यात
अपघात वाढले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
गडचिरोली : शहरातील आरमोरी, चामोर्शी, धानोरा व मूल या चारही मुख्य मार्गांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. अपघातांमध्येही वाढ झाली आहे.
शहरात एकही बायपास मार्ग नसल्याने प्रवाशी वाहनांसह मालवाहू वाहनेही शहराच्या मुख्य चौकातूनच जातात. त्याचबरोबर दुचाकी व चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. गांधी चौकापासून ते वन विभागाच्या नाक्यापर्यंत आरमोरी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. चामोर्शी मार्गावर दोन महिन्यांपूर्वी अंतर्गत वीज तार टाकण्याचे काम करण्यात आले होते. यासाठी ठिकठिकाणी मार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. त्यावर केवळ माती पसरविण्यात आली. मात्र सदर माती आता पावसामुळे दबल्याने या ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहने क्षतिग्रस्त होत आहेत. धानोरा व मूल मार्गावरही प्रचंड खड्डे पडले आहेत. एक खड्डा चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यामध्ये पडते. याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे धूळ उडत असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
सदर मार्ग दुरूस्त करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली आहे. मात्र या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने खड्डे कायम आहेत. (नगर प्रतिनिधी)