गडचिरोलीत गरजेच्या ठिकाणीच शिवभोजनाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:37+5:30

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला व बाल रुग्णालयात जिल्हाभरातील शेकडो रुग्ण भरती राहतात. सोबतच त्यांचे नातेवाईक सुद्धा येतात. रुग्णाला रुग्णालयामार्फत भोजन पुरविले जाते. मात्र त्याच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकाची अडचण राहते. १०० रुपये खर्च करून तो एकवेळचे जेवण करू शकत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी त्याला उपाशी राहावे लागते.

Gadchiroli lacks Shiva food at the required place | गडचिरोलीत गरजेच्या ठिकाणीच शिवभोजनाचा अभाव

गडचिरोलीत गरजेच्या ठिकाणीच शिवभोजनाचा अभाव

ठळक मुद्देकेंद्राचे ठिकाण बदलविणे गरजेचे : लॉकडाऊनमुळे रुग्णांच्या नातेवाईकांची उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गरजवंताला शिवभोजन मिळावे, या मुख्य उद्देशाने राज्य शासनाने अवघ्या १० रुपयात जेवण देणारी शिवभोजन योजना सुरू केली. मात्र गडचिरोली येथील शिवभोजनाचे केंद्र योग्य ठिकाणी नसल्याने गरजू व्यक्ती शिवभोजनापासून वंचित राहात आहेत. उलट स्वस्त मिळते म्हणून दर दिवशी शिवभोजनाचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला व बाल रुग्णालयात जिल्हाभरातील शेकडो रुग्ण भरती राहतात. सोबतच त्यांचे नातेवाईक सुद्धा येतात. रुग्णाला रुग्णालयामार्फत भोजन पुरविले जाते. मात्र त्याच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकाची अडचण राहते. १०० रुपये खर्च करून तो एकवेळचे जेवण करू शकत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी त्याला उपाशी राहावे लागते.
अशाच गरजवंतांसाठी राज्य शासनाने शिवभोजन ही योजना सुरू केली आहे. मात्र गडचिरोली येथील शिवभोजनाचे केंद्र मुख्य बाजारपेठ असलेल्या चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्स येथे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाºया नागरिकाला सदर केंद्र कुठे आहे, याची माहिती राहत नाही. त्यामुळे सेवा उपलब्ध असूनही माहिती नसल्याने उपासमारीची पाळी रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे. तर दुसरीकडे शिवभोजनाचा लाभ चामोर्शी मार्गावरील दुकानांमध्ये काम करीत असलेला नोकरवर्ग, दुकानदार व शिक्षणासाठी आलेले मुले येत असल्याचे दिसून येते.
वास्तविक या नागरिकांना शिवभोजनाची फारशी गरज नाही. मात्र स्वस्त मिळते म्हणून शिवभोजनाचा आस्वाद घेतात. शिवभोजन कक्ष मुख्यत्वे जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा महिला व बाल रुग्णालयाच्या परिसरातच असणे आवश्यक आहे. तरच शिवभोजनाचा खरा उद्देश सफल होईल.
त्यादृष्टीने जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

शिवभोजन मिळतेय फक्त पाच रुपयात
शिवभोजन यापूर्वी १० रुपयाला दिले जात होते. मात्र शासनाने १ एप्रिलपासून शिवभोजन थाळीची किंमत पाच रुपये केली आहे. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत ५ रुपये दर कायम राहणार आहे. गडचिरोली येथील शिवभोजन केंद्राला दिवसभरात केवळ २०० थाळींची मर्यादा होते. लॉकडाऊन झाल्यापासून काही नागरिक अडले आहेत. त्यांना जेवनाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शिवभोजन केंद्रांची मर्यादा दरदिवशी एक लाख थाळीपर्यंत वाढविली आहे.

परवानगी दिल्यास रुग्णालयातही व्यवस्था करू
ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र चालविण्याची परवानगी दिली आहे, त्या ठिकाणावरून दुसºया ठिकाणी भोजन वितरित करायचे असेल तर त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला व बाल रुग्णालयात निश्चितच शिवभोजनाची गरज आहे. त्या ठिकाणी शिवभोजन देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून परवानगी मागितली जाईल. त्यांच्या परवानगीनंतर भोजनाचे वितरण केले जाईल, अशी माहिती शिवभोजन केंद्र चालविणाºया संजीवनी बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Gadchiroli lacks Shiva food at the required place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.