गडचिरोलीत मुसळधार पाऊस -वीज पडून ४३ शेळ्या ठार
By Admin | Updated: May 16, 2015 01:55 IST2015-05-16T01:55:13+5:302015-05-16T01:55:13+5:30
गडचिरोली मुख्यालयासह जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारी २ नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

गडचिरोलीत मुसळधार पाऊस -वीज पडून ४३ शेळ्या ठार
तीन लाखांचे नुकसान : मारोडा गावात कळपावर वज्राघात
गडचिरोली/चामोर्शी : गडचिरोली मुख्यालयासह जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारी २ नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर चामोशी मुख्यालयापासून नऊ किमी अंतरावर असलेल्या मारोडा गावात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज पडून ४३ शेळ्या-मेंढ्या दगावल्याची घटना घडली. या घटनेत २० शेळ्या जखमी झाल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी गावातील कामरा राजन्ना निलावार हे आपल्या मालकीच्या शेळ्या-मेंढ्या घेऊन उमाजी माधव मोहुर्ले यांच्या शेतात थांबलेले होते. दरम्यान अचानक शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळली. यात ४३ शेळ्या-मेंढ्या दगावल्या. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार एम. जी. वैद्य, सहायक पोलीस निरिक्षक हुर्रे, मारोडाचे सरपंच घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत मृत शेळ्यांचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोवाची, डॉ. देवकुळे, डॉ. खाडे, डॉ. सरकार, डॉ. नैताम यांच्या चमुने मृत शेळ्या-मेंढ्यांवर शवविच्छेदन केले. जखमी असलेल्या २० शेळ्यांवर औषधोपचार करण्यात आले. निलावार यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद केली आहे.
गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी दुपारपासून संततधार पाऊस झाला. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले.
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अधेमध्ये वादळी वाऱ्यासह काही भागात पाऊस झाला होता. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने दुपारी दीड ते दोनच्या सुमारास संततधार पाऊस गडचिरोली शहरात झाला. त्यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले. शहरातील रस्त्यालगत बसणाऱ्या विक्रेत्यांचीही पावसामुळे तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वादळाने झाडांच्या फांद्याही तुटल्या तर काही ठिकाणी फलक उडाले. पावसामुळे रस्त्यावरची वाहतुकीही खोळंबलेली होती. मे महिन्याच्या मध्यार्धात पाऊस आल्याने शेतकरी आता शेतीच्या कामाला लागेल. लग्नाचा तसेच वास्तू कार्यक्रमाचाही शुक्रवारी ठोक होता. त्यांचीही अकाली पावसामुळे तारांबळ उडाली. शहरातील वीज पुरवठाही दिवसा अनेकदा वादळी पावसामुळे खंडीत झाला. गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा रात्री व दिवसाही खंडीत होत आहे.