राज्य कर्मचाऱ्यांचे गडचिरोलीत निदर्शने
By Admin | Updated: August 12, 2016 00:46 IST2016-08-12T00:46:41+5:302016-08-12T00:46:41+5:30
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांंच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

राज्य कर्मचाऱ्यांचे गडचिरोलीत निदर्शने
गडचिरोली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांंच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच विविध तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. चडगुलवार, कार्याध्यक्ष ए. आर. गडप्पा, सरचिटणीस बी. एस. मेश्राम, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा गडचिरोलीचे अध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतीफ पठाण, सरचिटणीस किशोर सोनटक्के, संघटक चंदू प्रधान यांनी केले. यावेळी नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, सातवा वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये सुधारणा करून त्या त्वरीत लागू करा, जानेवारी २०१६ पासून महागाई भत्ता वाढ मंजूर करा, सर्व विभागातील रिक्त पदे भरा, कामगार कायद्यात बदल करू नका, सरसकट सर्व सरकारी आस्थापणांचे खासगीकरण करण्यात येऊ नये, पाच दिवसांचा आठवडा लागू करा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करा आदींसह १५ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी राज्य कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाकडून हे निवेदन स्विकारले. निदर्शनाच्या वेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. सर्व तालुका मुख्यालयात संघटनेच्या वतीने निदर्शने करून तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. चडगुलवार यांनी दिली आहे. २ सप्टेंबरला देशव्यापी संप करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)