गडचिरोली पालिकेला मिळाले ५० लाख

By Admin | Updated: September 21, 2015 01:21 IST2015-09-21T01:21:00+5:302015-09-21T01:21:00+5:30

शहरात नवे घरबांधकाम व विद्युत मीटरसाठी नागरिकांना दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राच्या माध्यमातून गडचिरोली नगर पालिकेला गेल्या अडीच वर्षात ५० लाख २१ हजार ५९२ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Gadchiroli corporation gets 50 lakhs | गडचिरोली पालिकेला मिळाले ५० लाख

गडचिरोली पालिकेला मिळाले ५० लाख

अडीच वर्षांत : घर बांधकाम व वीज मीटर एनओसीची एकूण २१५ प्रकरणे मंजूर
लोकमत विशेष

दिलीप दहेलकर गडचिरोली
शहरात नवे घरबांधकाम व विद्युत मीटरसाठी नागरिकांना दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राच्या माध्यमातून गडचिरोली नगर पालिकेला गेल्या अडीच वर्षात ५० लाख २१ हजार ५९२ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. २०१३-१४ वर्ष ते २० सप्टेंबर २०१५ या अडीच वर्षाच्या कालावधीत गडचिरोली पालिकेने घर बांधकामाचे एकूण २१५ प्रकरणे मंजूर केली.
शहरातील विविध वार्डातील नागरिकांना अकृषक प्लॉटवर नव्याने घर बांधकाम करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. तसेच नवीन घरात वीज मीटर जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. सदर प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी दिली जाते.
१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या वर्षभराच्या कालावधीत घर बांधकामासाठी परवानगी मागितलेल्या नागरिकांच्या अर्जाची तपासणी करून एकूण ७७ प्रकरणे निकाली काढण्यात आले. या प्रकरणातून पालिका प्रशासनाला ८ लाख ६९ हजार २१३ रूपये कराच्या रूपात मिळाले. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या एक वर्षाच्या कालावधीत नव्या घर बांधकामाचे पालिका प्रशासनाने ११६ प्रस्ताव मंजूर केले. संबंधित नागरिकांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. या माध्यमातून पालिकेला कराच्या रूपात १६ लाख ५२ हजार ३७९ रूपयांचा महसूल प्राप्त झाला. २०१५-१६ या चालू वर्षात १ एप्रिल ते २० सप्टेंबर २०१५ पर्यंत घर बांधकामाबाबतचे २२ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून यातून पालिकेला १० लाख रूपयांचा महसूल मिळाला. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत पालिकेला घर बांधकाम एनओसीतून ३५ लाख २५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.
न.प. प्रशासनाकडून एका महिन्यात जवळपास १०० नागरिकांना वीज मीटर जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येते. प्रती प्रमाणपत्र ५०० रूपये प्रमाणे एका महिन्याला ५० हजार रूपये मिळतात. २०१३-१४ व २०१४-१५ या दोन वर्षात पालिकेला वीज मीटर एनओसीच्या माध्यमातून १२ लाख व २०१५-१६ या चालू वर्षात २० सप्टेंबरपर्यंत तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. एकूणच अडीच वर्षाच्या कालावधीत पालिकेला वीज मीटर एनओसीतून १५ लाख रूपये मिळाले.

एनओसीकरिता आवश्यक कागदपत्रे
अकृषक प्लॉटवर नागरिकांना घर बांधकाम करण्यासाठी न.प.कडून नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. याकरिता अकृषक जमिनीचा सातबारा, भूखंडाचा लेआऊट, जमिनीचे अकृषक आदेश प्रमाणपत्र, विक्रीपत्र, घर बांधकामाचा नकाशा, मान्यताप्राप्त अभियंत्याच्या स्वाक्षरीचा अर्ज आदी कागदपत्रे आवश्यक आहे.

घर बांधकाम एनओसीचे २५ प्रस्ताव प्रलंबित
अकृषक प्लॉटधारक नागरिकांनी पालिकेकडे एनओसीकरिता अर्ज सादर केले आहेत. मात्र या अर्जासोबत अनेक आवश्यक कागदपत्रे नसल्याने चालू वर्षात घर बांधकामाचे जवळपास २५ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे. कागदपत्राची तपासणी आटोपल्यावर प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन तपासणी केल्यानंतर पालिकेकडून घर बांधकामासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. अकृषक प्लॉटच्या बाजार भावानुसार घर बांधकाम एनओसीकरिता न.प.कडून संबंधित घरमालकांवर शुल्क आकारण्यात येते.

Web Title: Gadchiroli corporation gets 50 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.