अहेरी जिल्ह्यासाठी गडचिरोलीत चक्काजाम
By Admin | Updated: December 4, 2014 23:08 IST2014-12-04T23:08:56+5:302014-12-04T23:08:56+5:30
दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी. या मागणीसाठी अहेरी जिल्हा कृती समिती व राष्ट्रीय जनहितवादी व युवा समिती यांच्यावतीने प्रज्वल

अहेरी जिल्ह्यासाठी गडचिरोलीत चक्काजाम
गडचिरोली : दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी. या मागणीसाठी अहेरी जिल्हा कृती समिती व राष्ट्रीय जनहितवादी व युवा समिती यांच्यावतीने प्रज्वल नागुलवार व सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात अहेरी, एटापल्ली तालुक्यातील शेकडो नागरिक गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात दुपारी २ वाजताच्या सुमारास अर्धा तास चक्काजाम आंदोलन केले. यामुळे शहरातील विस्कळीत झाली.
जारावंडी, कसनसूर, गट्टा, पेरमिली, जिमलगट्टा, आष्टी या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, एटापल्ली, धानोरा, भामरागड परिसरातून वाहणाऱ्या बांडीया नदीवर मोठे धरण बांधण्यात यावे, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, अहेरी, सिरोंचा या भागातून वाहणाऱ्या नदी, नाल्यांवर धरणे बांधून सिंचनाची सोय करावी, बांबू व इतर गौण खनिजांचे व्यवस्थापन व विक्रीचे अधिकार ग्रामसभांना देण्यात यावे, आदिवासी व गैरआदिवासींच्या शाश्वत विकासाकरीता पेसा कायद्याची त्वरीत अंमलबजावणी करावी, वैयक्तिक व सामुहिक वनहक्क दाव्यांवर प्रक्रिया करून वंचिताना वनहक्क प्रदान करावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, जिल्हा मंडळ स्थापन करून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, शिक्षण पध्दतीत सुधारणा करावी, धानाला प्रती क्विंटल ४ हजार रूपये किंमत व ५०० रूपये बोनस देण्यात यावे आदी मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलनानंतर अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती, एटापल्ली व राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व राष्ट्रीय जनहितवादी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बारसागडे, प्रज्वल नागुलवार, अमोल दुर्गे, अरविंद मोहुर्ले, सरिता पुंगाटी, राकेश पुंगाटी, पायल बारसा, निर्मला ओंगुलवार, दीक्षा झाडे यांच्यासह ३०० ते ४०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी या आंदोलनाला भेट देऊन निवेदन स्वीकारले. यावेळी हसनअली गिलानी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला पाठींबा घोषीत केला आहे. (नगर प्रतिनिधी)