वैनगंगा नदीवरील पुलाचे भवितव्य अंधांतरी
By Admin | Updated: April 2, 2016 01:49 IST2016-04-02T01:49:28+5:302016-04-02T01:49:28+5:30
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पूल हा ठेंगणा असल्याने पावसाळ्यात पुरामुळे कित्येकदा मार्ग बंद असतो.

वैनगंगा नदीवरील पुलाचे भवितव्य अंधांतरी
आष्टी-गोंडपिंपरी मार्ग : जुन्या पुलाची मर्यादा संपली
आष्टी : चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पूल हा ठेंगणा असल्याने पावसाळ्यात पुरामुळे कित्येकदा मार्ग बंद असतो. तसेच हा पूल बऱ्याच वर्षापूर्वीचा असल्याने या पुलाची मर्यादाही संपलेली आहे. या नदीवर नवीन पुलाची मागणी नागरिकांनी केली. परंतु अलीकडेच घाटकुळ-मुधोली-येनापूर रस्त्यावरील वैनगंगा नदीवर उंच पातळीच्या मोठ्या पुलाच्या बांधकामाला केंद्रीय मार्ग निधीतून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे भवितव्य सध्यातरी अधांतरी असल्याचे दिसते.
चंद्रपूरवरून येणारा राष्ट्रीय महामार्ग बामणीपर्यंत चारपदरी करण्यात आला आहे. पुढे तो आष्टीपर्यंत होणार असल्याची चर्चा आहे. परंतु अलीकडेच पोंभुर्णा-चामोर्शी तालुका जोडणारा मोठा पूल वैनगंगा नदीवर केंद्रीय निधीतून होणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आता आष्टीजवळील पूल होण्याची आशा मावळली आहे.
यामागे कारण म्हणजे १० किमी अंतरावर लगेच नवीन पुलाला मंजुरी मिळणार काय, तसेच सध्याचा पूल हा बुडीत पूल म्हणून नोंद आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाबद्दल अनेक शंका उपस्थित होत आहे. तेलंगणा सरकारतर्फे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आष्टी येथील पूल पाण्याखाली राहण्याची शक्यता आहे. आष्टी शहरातून चंद्रपूर, सिरोंचा व साकोली-सिरोंचा हे दोन्ही महामार्ग जात असताना हा आडवाटेचा पूल बनवून गोंडपिपरी-आष्टी हा मार्ग बंद करण्याचा घाट दिसतो.
जुन्या मार्गाला उलट खर्च कमी येऊ शकतो. जुन्या पुलाची उंची वाढवून सरळ असणारा मार्ग डावलून काय साध्य करायचे आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सिरोंचा-अहेरीपासून उपराजधानीला जोडणारा हा सरळ मार्ग आहे. दिवसातून महामंडळाच्या खासगी बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. वाहनाची संख्या वाढल्याने या मार्गावरील रहदारीही वाढलेली आहे. वैनगंगा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.