२०० आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

By Admin | Updated: September 17, 2014 23:48 IST2014-09-17T23:48:09+5:302014-09-17T23:48:09+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील मल्लेर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाने बंद केली आहे.

The future of 200 tribal students in the dark | २०० आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

२०० आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

अहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील मल्लेर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाने बंद केली आहे. यामुळे या आश्रमशाळेत शिकणाऱ्या २०० च्यावर आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे. सदर आश्रमशाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी आदिवासी विकास प्रधान सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय असून या आश्रमशाळेत लोहारा परिसरातील १० ते १५ गावातील २०० च्यावर आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत होते. आदिवासी विकास विभागाच्या अहेरी प्रकल्प कार्यालयातर्फे या आश्रमशाळेची तपासणी करण्यात आली. या आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतच्या वर्गाची पटसंख्या कमी आढळल्यामुळे या आश्रमशाळेतील १ ते ४ वर्ग बंद करण्यात आले. त्यानंतर या आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्याचा प्रस्ताव अहेरीच्या प्रकल्प कार्यालयाने शासनाकडे पाठविला. त्यानंतर शासनाच्या मंजुरीनंतर आदिवासी विकास विभागाने लोहाराची आश्रमशाळा पूर्णपणे बंद केली. विशेष म्हणजे इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतची विद्यार्थी संख्या पुरेशी असतांना सर्वच वर्ग बंद करण्याचा चुकीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आल्याचा आरोप पालकांनी निवेदनातून केला आहे.
लोहारानजीकच्या १० ते १५ गावांपैकी एकाही गावात इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय नाही, त्यामुळे या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. लोहारा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील दाखल विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येऊ नये, लोहाराची आश्रमशाळा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी राज्याचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीचा ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला आहे. अहेरीच्या प्रकल्प कार्यालयाने लोहाराची आश्रमशाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र लोहाराची आश्रमशाळा अद्यापही सुरू झाली नाही. अर्धे अधिक शैक्षणिक सत्र संपत आले आहे. आश्रमशाळा सुरू झाली नाही. त्यामुळे या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The future of 200 tribal students in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.