नगर पंचायतीला जिल्हा वार्षिक योजनेतून निधी द्या
By Admin | Updated: December 13, 2015 01:35 IST2015-12-13T01:35:41+5:302015-12-13T01:35:41+5:30
शासनाने नगर पंचायतीची स्थापना केली असली तरी नगर पंचायतीकडे उत्पन्नाचे स्त्रोत अत्यंत मर्यादित आहेत.

नगर पंचायतीला जिल्हा वार्षिक योजनेतून निधी द्या
पालकमंत्र्यांना निवेदन : पाच कोटी रूपयांची केली मागणी
अहेरी : शासनाने नगर पंचायतीची स्थापना केली असली तरी नगर पंचायतीकडे उत्पन्नाचे स्त्रोत अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून नगर पंचायतीला पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार यांनी केली आहे.
ज्या ठिकाणी नगर पंचायती स्थापन झाल्या आहेत, त्या ठिकाणची लोकसंख्या २० ते २२ हजारांच्या जवळपास आहे. या ठिकाणी यापूर्वी ग्राम पंचायती होत्या. नगर पंचायतीची स्थापना शासनाने केली असली तरी उत्पन्नाचे कोणतेही अतिरिक्त स्त्रोत तयार करून दिले नाही. त्यामुळे ग्राम पंचायतीएवढेच उत्पन्न मिळाल्यास शहराचा विकास करण्यास अडचण जाणार आहे. नगरोत्थान विकास विभागानेही निधी दिला नाही.
अहेरी शहरातील रस्ते, नाली यांची दुरूस्ती, शौचालय बांधकाम, विद्युतीकरण, सुशोभिकरण, बालोद्यान, व्यायाम शाळा, घंटागाडी व स्वच्छता ठेवण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज आहे. सदर निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार यांच्यासह उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, सभापती नारायण सिडाम, स्मिता येडुलवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, गिरीश मद्देर्लावार, रेखा सडमेक, कमल पडगेलवार, हर्षा ठाकरे, मालुताई तोडसाम, शंकर मगडीवार, विलास खरवडे, श्रीनिवास मगडीवार यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)