निधीवर आक्षेप : आम आदमी पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखूमुक्ती कार्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्याकडून सर्च या संस्थेला ५० लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र सदर निधी समाजकल्याण विभागाने सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या मार्फतीने सर्च या संस्थेला ५० लाख रूपयांचा निधी वळता केला आहे. सद्य:स्थितीत तंबाखू व दारू मुक्तीसाठी ५ कोटी रूपये खर्च करण्याची गरज आहे काय, असा सवाल आम आदमी पक्षाचे जिल्हा संयोजक प्रा. अशोक लांजेवार, जिल्हा सहसंयोजक भगवान चुधरी यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक आजाराने लोक त्रस्त आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआयआरची यंत्रणा लावण्यासाठी हा निधी दिल्यास जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना याचा लाभ होईल. एमआयआर यंत्रणेमुळे ब्रेन स्पाईन, अॅबडॉमिन, पेलव्हीस, हातपाय ब्रेकिंयल, प्लेक्सेस, प्रोस्टेट आदींच्या रुग्णांनाही दिलासा मिळेल. महाराष्ट्रात कोणत्याही जिल्हा सामान्य रुग्णालयात अशी व्यवस्था नाही. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात अशी सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्यास मोठ्या शहरात महागडी औषधी व उपचाराचा खर्च करण्यापासून नागरिकांना दिलासा मिळेल. त्यामुळे आदिवासी विकास विभागामार्फत सर्च संस्थेला मंजूर केलेला निधी देऊ नये, तो जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआयआर मशीन खरेदीसाठी द्यावा, अशी मागणीही आप पक्षाने केली आहे.या संस्थेला निधी दिल्या गेल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही आपचे जिल्हा संयोजक लांजेवार यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा सामान्य रुग्णालयाला एमआयआर मशीनसाठी निधी द्या
By admin | Updated: June 24, 2016 02:03 IST