टीएचओ कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:17 IST2017-09-17T23:17:03+5:302017-09-17T23:17:19+5:30
ग्रामीण व दुर्गम भागात राहून आरोग्य सेवेचे काम करणाºया आशावर्करला अत्यल्प मानधन दिले जाते. या मानधनावर आशांना सेवा द्यावी लागते, असे असतानाही एप्रिल महिन्यापासून त्यांचे मानधन थकीत आहे.

टीएचओ कार्यालयावर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : ग्रामीण व दुर्गम भागात राहून आरोग्य सेवेचे काम करणाºया आशावर्करला अत्यल्प मानधन दिले जाते. या मानधनावर आशांना सेवा द्यावी लागते, असे असतानाही एप्रिल महिन्यापासून त्यांचे मानधन थकीत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आशावर्कर्सनी आयटकच्या नेतृत्त्वात भामरागड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला घेराव घातला.
आशावर्करमुळे ग्रामीण भागातील बालमृत्यू, मातामृत्यू दर कमी झाला आहे. नागरिकांना प्रवृत्त केल्यामुळे ते रूग्णालयात जात आहेत. परंतु आशा व गटप्रवर्तकांना अल्प मानधन देऊन त्यांना वेठबिगारीसारखे वागविले जात आहे. एप्रिल २०१७ पासून त्यांना अद्यापही मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या आशा व गटप्रवर्तकांनी आयटकचे नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्त्वात आरेवाडा मार्गावरील किसान भवनातून शनिवारी दुपारी मोर्चा काढून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला घेराव घातला. परंतु कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी, बीसीएम व अकाऊंटंट गैरहजर राहिल्याने कर्मचाºयांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले तेव्हा एका कर्मचाºयाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. डॉ. मेश्राम यांनी संघटनेला येत्या दोन दिवसांत सर्व थकीत मानधन देऊ, असे आश्वासन दिले. तसेच सप्टेंबर महिन्यापासून पुढे वेळेवर मानधन देण्याचे मान्य केले. तसेच मलेरिया हेडवरील दोन वर्षापासूनचा निधी आला नसल्याने याचाही पाठपुरावा करण्याचे सांगितले.
या आंदोलनाचे नेतृत्त्व विनोद झोडगे, तालुकाध्यक्ष भूमिका कांबळे, सोनिया बावणे, छाया शेडमाके, महानंदा आत्राम, किरण कुमरे, पुष्पा तलांडे यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील शेकडो आशा व गटप्रवर्तक उपस्थित होते.
गटप्रवर्तकांची चार पदे रिक्त
भामरागड तालुका दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. या तालुक्यात आरोग्यसेवा पोहोचविणे अनेकदा अडचणीचे ठरते. शिवाय वेळीच रूग्णाला औषधोपचार करण्यातही अडचणी येतात. असे असतानाही तालुक्यातील चार गटप्रवर्तकांची पदे रिक्त आहेत. संघटनेने सदर बाब तालुका आरोग्य अधिकारी मेश्राम यांच्या लक्षात आणून दिली असता, याबाबतचा पाठपुरावा जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे केला असल्याचे सांगितले.