१२ लाख शेतकरी साधणार मोफत संवाद
By Admin | Updated: November 3, 2015 00:43 IST2015-11-03T00:43:47+5:302015-11-03T00:43:47+5:30
बीएसएनएलने महाकृषी संचार योजनेंतर्गत शेतकरीवर्गासाठी तीन वेगवेगळे प्लॅन सादर केले होते. १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण केले आहे.

१२ लाख शेतकरी साधणार मोफत संवाद
कृषी प्लॅनचे एकत्रिकरण : नवीन योजनेचा शेतकऱ्यांना लाभ
गडचिरोली : बीएसएनएलने महाकृषी संचार योजनेंतर्गत शेतकरीवर्गासाठी तीन वेगवेगळे प्लॅन सादर केले होते. १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण केले आहे. त्यामुळे राज्यभरातील १२ लाख शेतकरी एकमेकांसोबत मोफत संवाद साधू शकणार आहेत.
शेतकऱ्यांना आपसात चर्चा करता यावी, त्याचबरोबर त्यांच्यावर मोबाईल बिलाचा अधिक भार पडू नये, या उद्देशाने बीएसएनएलने महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यात २००९ साली महाकृषी संचार योजना सुरू केली होती. या योजनेचे राज्यात एकूण १३ लाख ग्राहक आहेत. ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात १०९ रूपयात १ जीबी डाटा, ६ तास बीएसएनएलवरून बीएसएनएल व दीड तास बीएसएनएल ते अदर तसेच ५०० एसएमएस पाठविता येत होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १०८ चा प्लॅन सुरू करण्यात आला. या प्लॅनमध्ये बीएसएनएल ते बीएसएनएल ३ तास, इतर नेटवर्क २ तास, ४०० एसएमएस व २०० एमबी डाटा देण्यात येत होता. त्यानंतर २०१५ मध्ये १२८ चा प्लॅन आणला. सदर प्लॅनमध्येही ३ तास बीएसएनएल ते बीएसएनएल व १ तास इतर नेटवर्कवर बोलता येत होते. त्याचबरोबर ३०० एसएमएस व २०० एमबी डाटा दिला जात होता.
या तिन्ही प्लॅनमध्ये पहिला १०९ रूपयांचा प्लॅन सर्वात लाभदायक होता. मात्र बीएसएनएलने १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्लॅनमध्ये कृषी सीमच्या सर्व ग्राहकांना १४१ रूपयांचा इजी रिचार्ज मारावा लागणार आहे. यामध्ये ४५० मिनीटे बीएसएनएल ते बीएसएनएल व ५० मिनीटे इतर नेटवर्कवर बोलता येणार आहे. त्याचबरोबर ४०० एमबी डाटा व ५०० एसएमएस पाठविता येणार आहेत. यानंतर मात्र प्रती मिनीट ५० पैसे दर आकारला जाणार आहे. यापूर्वी एका कृषी प्लॅनमधील व्यक्तींना मोफत बोलता येत होते. मात्र दुसऱ्या कृषी प्लॅनमधील व्यक्तीला फोन करण्यासाठी मिनीटे कपात केली जात होती. यानंतर मात्र या तिन्ही कृषी प्लॅनमधील मोबाईलधारकांना १ नोव्हेंबरपासून मोफत बोलता येणार आहे. (प्रतिनिधी)