१ एप्रिलपासून घर, गाव, जिल्हा दारूमुक्त करा
By Admin | Updated: April 1, 2015 01:32 IST2015-04-01T01:32:15+5:302015-04-01T01:32:15+5:30
राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ पासून लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी सुरू होत आहे.

१ एप्रिलपासून घर, गाव, जिल्हा दारूमुक्त करा
गडचिरोली : राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ पासून लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी सुरू होत आहे. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर असा तीन जिल्ह्याचा दारूमुक्त झोन अस्तित्वात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे. १ एप्रिल पासून सर्व जनतेनी आपले घर, गाव, जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी केले आहे.
कायदा जनतेच्या पाठीशी आहे. त्यामुळे वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या तीन जिल्ह्यातील महिलांनी दारूमुक्तीसाठी प्रयत्न करावेत. दारूबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीवरच दारूबंदीचा फायदा होणार आहे. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येऊन घरातील पूरूष, तंटामुक्त समिती, सरपंच, पोलीस निरिक्षक, आमदार, जिल्हाधिकारी व मंत्री अशा चढत्या क्रमांने आग्रह धरून आपला न्याय व हक्क मिळवून घ्यावा, दारूमुक्तीशिवाय समाजात महिला निर्भय, सुरक्षित, सुखी व स्वतंत्र होऊ शकत नाही. केवळ दारूबंदी करून थांबण्याची चूक यापूर्वीच्या शासनाने केली. ती चूक विद्यमान राज्य सरकारने करू नये. दारूबंदीमुळे बुडणाऱ्या शासकीय करापेक्षा लोकांना मिळणारा फायदा अधिक व्हायचा असल्यास वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या तीन जिल्ह्यात दारूबंदीची यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी दारूबंदीच्या अंमलबजावणीचा संपूर्ण आराखडा आखून तो तत्काळ जाहीर करावा. अंमलबजावणीची ब्ल्यूप्रिंट देवतळे समितीच्या रूपाने यापूर्वीच तयार झालेली आहे. शासनाने तसा संपूर्ण कार्यक्रम अमलात आणावा, तीन जिल्हे मिळून दरवर्षी दारूवर एक हजार कोटी रूपये खर्च होतात. दारूबंदीने जनतेला फायदा होईल, असेही डॉ. अभय बंग यांनी म्हटले आहे.