चारचाकी वाहनाची दुचाकीला समोरून धडक
By Admin | Updated: November 23, 2015 01:13 IST2015-11-23T01:13:39+5:302015-11-23T01:13:39+5:30
नागपूरवरून हेमलकसाकडे येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने चौडमपल्लीकडून आष्टीकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून जबर धडक दिल्याने ...

चारचाकी वाहनाची दुचाकीला समोरून धडक
एक ठार, एक गंभीर : आष्टी-आलापल्ली मार्गावरील चंदनखेडी गावानजीकची घटना
आष्टी : नागपूरवरून हेमलकसाकडे येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने चौडमपल्लीकडून आष्टीकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून जबर धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार व एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावर चंदनखेडी गावानजीक घडली.
सुरेश उराडे (२२) रा. गोंडपिपरी असे पुढील उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर शैलेश राऊत (३०) रा. गोंडपिंपरी हा गंभीर जखमी झाला आहे.
एमएच ३१ सीपी ११०० ही तवेरा कार नागपूरवरून हेमलकसाकडे जात होती. समोरून चौडमपल्लीकडून आष्टीकडे एमएच ३४-४०३० ही दुचाकी येत होती.
दरम्यान चंदनखेडी गावानजीक या दोन वाहनांची जबर धडक झाली. यात दुचाकीवरील शैलेश राऊत व सुरेश उराडे रा. गोंडपिंपरी हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर दोघांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना चंद्रपूरला नेत असताना सुरेश उराडे याचा वाटेतच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद आष्टीच्या पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार संघरक्षीत फुलझेले, मुनिश्वर रात्रे, प्रमोद उंदीरवाडे करीत आहेत. (प्रतिनिधी)
वैरागड येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक; दोन जखमी
कुरखेडावरून आपल्या स्वगावी धुंडेशिवणीकडे जाणाऱ्या दुचाकीची विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना वैरागड-रांगी मार्गावर वैरागड येथील भंडारेश्वर मंदिरासमोरील वळणावर रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात पोलीस शिपाई महादेव तुळशीराम मेश्राम व दुचाकीस्वार रूपेंद्र मुर्लीधर शेंडे हे दोघेही जण जखमी झाले. कोरची तालुक्यात पोलीस विभागात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेले महादेव मेश्राम स्वगावी धुंडेशिवणीकडे जात होते. दरम्यान रांगीवरून आरमोरीकडे जाणाऱ्या रूपेंद्र शेंडे याच्या दुचाकीची धडक बसली. यात दोघेही जण जखमी झाले. दोन्ही जखमींना आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती वैरागडचे पोलीस पाटील गोरख भानारकर यांनी आरमोरी पोलिसांना दिली.
खड्ड्यांमुळे दुसऱ्यांदा अपघात
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूस्त कारभारामुळे अहेरी-आष्टी व आष्टी-चामोर्शी या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात वाढले आहेत.
शनिवारी आष्टी-चामोर्शी मार्गावर खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात बस व दुचाकीचा अपघातात झाला. यात निलकंठ रोहणकर हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला चंद्रपूरला नेत असताना बल्लारपूर येथे वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
अहेरी-आष्टी, आष्टी-चामोर्शी मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.