कुरखेडातील चार वॉर्डांमध्ये पाण्यासाठी पायपीट
By Admin | Updated: December 13, 2015 01:40 IST2015-12-13T01:40:24+5:302015-12-13T01:40:24+5:30
शहरातील प्रभाग क्र. १४, १५, १६ व १७ येथे पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा केला जात नाही.

कुरखेडातील चार वॉर्डांमध्ये पाण्यासाठी पायपीट
खासगी नळजोडणी द्या : महिलांचे सभापतींना निवेदन
कुरखेडा : शहरातील प्रभाग क्र. १४, १५, १६ व १७ येथे पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे या वॉर्डांमध्ये हिवाळ्यांमध्येच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे नगर पंचायतीने लक्ष न दिल्यास उन्हाळ्यात या वॉर्डांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर पंचायतीने लक्ष घालावे, अशी मागणी पाणीपुरवठा सभापती पुंडलिक देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून महिलांनी केली आहे.
कुरखेडा शहरातील प्रभाग क्र. १४, १५, १६ व १७ मध्ये खासगी नळांची संख्या अत्यंत कमी आहे. या वॉर्डातील अनेक नागरिक खासगी नळ जोडणी घेण्यास तयार असले तरी नगर पंचायत मात्र नळ जोडणी वेळेवर करून देत नाही. अनेक नागरिकांचे प्रस्ताव वर्षभरापासून नगर पंचायतीमध्ये पडून आहेत. या चारही वॉर्डांवर नगर पंचायत प्रशासन पाण्याबाबत अन्याय करीत आहे. वर्षभर कधीच पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जात नाही. परिणामी नागरिकांना हातपंप, विहीर यांचे पाणी प्यावे लागत आहे. नळाद्वारे अत्यंत कमी पाणी पुरवठा होत असल्याने हिवाळ्यातच या वॉर्डांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलावर्ग दुसऱ्या वॉर्डात जाऊन पिण्यासाठी पाणी आणतात. इतर नागरिकांएवढाच पाणी कर या वॉर्डातीलही नागरिक भरत असल्याने त्यांनाही पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे नगर पंचायतीचे कर्तव्य आहे. मात्र यापूर्वीच्या ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी या वॉर्डाकडे दुर्लक्ष केल्याने पाणीटंचाईची समस्या कायम राहिली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल, याची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.