चार प्रभागांमध्ये घमासान
By Admin | Updated: October 25, 2015 01:18 IST2015-10-25T01:18:51+5:302015-10-25T01:18:51+5:30
येथील नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. १, ३, ७ व ११ मध्ये अनेक दिग्गज उभे असून त्यांच्या विजयासाठी राजकीय पक्षांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

चार प्रभागांमध्ये घमासान
कुरखेडा नगर पंचायत : प्रभाग क्र. १, ३, ७, ११ मध्ये दिग्गजांचे खंदे समर्थक मैदानात
कुरखेडा : येथील नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. १, ३, ७ व ११ मध्ये अनेक दिग्गज उभे असून त्यांच्या विजयासाठी राजकीय पक्षांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या चार प्रभागाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्र. १ मधून शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांचे विश्वासू कार्यकर्ते डॉ. महेंद्र मोहबंशी हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांची गाठ भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे यांच्याशी आहे. याच प्रभागातून इतरही उमेदवार रिंगणात आहेत. निवणुकीची घोषणा होताच मोहबंशी यांच्या प्रचाराची धुरा चंदेल यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याने सदर जागेची लढत शिवसेना व भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. प्रभाग क्र. ३ मध्ये काँग्रेस पक्षातर्फे माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या निकटवर्तीय व विश्वासू माजी सरपंच आशा तुलावी मैदानात आहेत. तिकीट वाटपात तुलावी यांच्या हस्तक्षेपामुळे एक गट दुखावला गेला आहे. ही नाराजी मोडीत काढत त्यांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी गेडाम यांच्या खांद्यावर राहणार आहे.
प्रभाग क्र. ७ मध्ये भाजपाकडून अॅड. उमेश वालदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते प्रकाश पोरेड्डीवार यांचे खंदे समर्थक आहेत. ते काँग्रेसमधून भाजपवासी झाले होते. या उमेदवारीवरून भाजपाअंतर्गत मोठा खल माजला होता. अंतिमक्षणी पोरेड्डीवार यांनी आपल्या बळाचा वापर करीत वालदे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे अंतर्गत कलहाला दूर सारून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पोरेड्डीवार यांना पेलावी लागणार आहे. प्रभाग क्र. ११ मध्ये भाजपातर्फे सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठे नाव असलेले फाये कुटुंबातील नागेश फाये निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचेही पदार्पण होत असल्याने त्यांच्या प्रचाराची जबाबदारी पं. स. सदस्य चांगदेव फाये यांच्यासह कुटुंबावर राहणार आहे. एकूणच कुरखेडातील राजकीय वातावरण या लढतीमुळे तापले आहे. (तालुका प्रतिनिधी)
धानोरात महिलांच्या प्रभागात निवडणूक चुरशीची
धानोरा - धानोरा नगर पंचायत निवडणुकीत ९ प्रभाग महिलांसाठी राखीव आहे. महिलांच्या राखीव जागांवरही तुल्यबळ उमेदवार असल्याने येथेही चुरशीची निवडणूक होण्याचे चिन्ह आहे. प्रभाग २ मधून भाजपातर्फे कळयामी सुनंदा वामन, काँग्रेसतर्फे अनिता विरेंद्र तुमराम, शिवसेनेतर्फे निराशा घनश्याम मडावी, अपक्ष उमेदवार म्हणून मंगला जनार्धन मडावी निवडणूक लढवित आहेत. प्रभाग क्र. ५ मधून शिवसेनेकडून चंद्रकला मारोती पदा, काँग्रेसकडून पौर्णिमा शिवदास मडावी, भाजपाकडून गीता पे्रमलाल वालको, अपक्ष म्हणून कालिंदा तुळशीराम कुळमेथे निवडणूक लढत आहे. प्रभाग क्र. ६ मधून काँग्रेसकडून जया प्रभाकर वरवाडे, भाजपकडून लीना साईनाथ साळवे निवडणूक लढत आहे. या ठिकाणी काट्याची लढत असून भाजप, काँग्रेस दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रभाग क्र. ७ मध्ये भाजपकडून उज्ज्वला अनिल मोहुर्ले, काँग्रेसकडून संध्या सुधाकर लेनगुरे तर अपक्ष म्हणून अर्चना रवींद्र लेनगुरे मैदानात आहेत. प्रभाग क्र. ९ मध्ये काँग्रेसकडून रत्नाबाई सखाराम जाळे, भाजपकडून रेखा गणपत हलामी, अपक्ष भाविका लिवेश मडावी मैदानात आहे. प्रभाग क्र. १० मध्ये काँग्रेकडून वनमाला वामन गावतुरे, भाजपकडून वनिता कालिदास निकेसर, शिवसेनेकडून सुवर्णा ज्ञानेश्वर भुरसे, अपक्ष नलिना बाजीराव गुरनुले, शेवंता सुखदेव थूल मैदानात आहेत. प्रभाग क्र. ११ मध्ये भाग्यश्री भाऊराव गुरनुले, काँग्रेसकडून मनीषा ओमदेव सोनुले, अपक्ष रंजना प्रकाश सोनुले निवडणूक लढत आहेत. प्रभाग क्र. १५ मध्ये काँग्रेसतर्फे वंदना रिनोहर उंदीरवाडे, भाजपतर्फे वैशाली कुमोद म्हशाखेत्री, शिवसेनेतर्फे निरंजना काशिनाथ म्हशाखेत्री, अपक्ष धाराताई राजेश जांभुळकर, प्रीती विवेक म्हशाखेत्री, वैशाली विनोद म्हशाखेत्री निवडणूक लढत आहे. प्रभाग क्र. १६ मध्ये काँग्रेसच्या जनाबाई प्रभाकर वरवाडे, भाजपकडून ताराबाई गोपाळा कोटांगले, अपक्ष अर्चना नरेश बोडगेलवार व वर्षा महेश चिमुरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय पुरूषाच्या प्रभागातूनही काही महिला उमेदवार रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्र. ३ मध्ये ममता रमाजी भैसारे, प्रभाग क्र. १७ मध्ये पुरूषाच्या प्रभागात नीलिमा नाजुकराव मडावी शिवसेनेकडून मैदानात आहे.