अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त
By Admin | Updated: December 13, 2014 01:47 IST2014-12-13T01:47:42+5:302014-12-13T01:47:42+5:30
येथून जवळच असलेल्या कुकडी (विहीरगाव) च्या रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणारे चार ट्रक्टर आरमोरीचे तहसीलदार फुलसंगे यांनी जप्त केले.

अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त
वैरागड : येथून जवळच असलेल्या कुकडी (विहीरगाव) च्या रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणारे चार ट्रक्टर आरमोरीचे तहसीलदार फुलसंगे यांनी जप्त केले. तसेच ट्रॅक्टर मालकांवर १ लाख २४ हजार रूपयाचा दंड वसूल आकारला.
आरमोरी तालुक्यातील वैरागडनजीकच्या कुकडी (विहिरगाव) रेतीघाटावरून अवैध रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती आरमोरीचे तहसीलदार फुलसंगे यांना मिळाली. तहसीलदार फुलसंगे यांनी मंडळ अधिकारी घरत व तलाठी रामटेके यांच्यासह सकाळी ५ वाजताच्या सुमारास रेतीघाटावर जाऊन धाड टाकली. दरम्यान रेती तस्करांना रेतीची वाहतूक करताना रंगेहाथ पकडले. सर्व ट्रॅक्टरची तपासणी केली. त्यांचेवर नियमानुसार प्रती ट्रॅक्टर ३० हजार रूपये दंड व १ हजार रूपये असा एकूण १ लाख २४ हजाराचा दंड आकारला. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमध्ये हरि नंदूजी मेश्राम रा. वडधा यांच्या मालकिची एमएच ३३ एफ १०२९, विहिरगाव येथील लोमेश मुखरू रोहणकर यांच्या मालकिची एमएच ३३-१४६८ व एमएच ३३-२६३२ तसेच नरोटी चक येथील किरण पांडुरंग कुमरे यांच्या मालकीच्या एमएच ३३ एफ ३२१२ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे.
आरमोरीचे तहसीलदार फुलसंगे यांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात धाडसत्र सुरू केल्यामुळे अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराचे धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)