चार दुकाने फोडली

By Admin | Updated: February 19, 2016 01:37 IST2016-02-19T01:37:19+5:302016-02-19T01:37:19+5:30

अज्ञात चोरट्यांनी बुधवारच्या रात्री गडचिरोली शहरातील चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून दुकानांमधील रोख

Four shops broke | चार दुकाने फोडली

चार दुकाने फोडली

गडचिरोली : अज्ञात चोरट्यांनी बुधवारच्या रात्री गडचिरोली शहरातील चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून दुकानांमधील रोख रकमेची चोरी केली. त्याचबरोबर दुकानातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा दुकानांमध्ये चोरी झाल्याने व्यावसायिक धास्तावले आहेत.
चामोर्शी मार्गावरील शुभम जुगल किशोर काबरा यांच्या मालकीच्या हनुमान ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानाचे अगदी समोरच्या शटरचे कुलूप तोडले व आतमध्ये प्रवेश केला. काऊंटरमध्ये ठेवलेली ५ हजार ५०० रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. त्याचबरोबर पॅनकार्ड, एटीएम कार्ड, मतदान कार्ड सुद्धा चोरून नेले. त्याचबरोबर दुकानातील सामान अस्थाव्यस्त फेकून दिले. त्यामुळे हजारो रूपयांचे नुकसान झाले. रेड्डी गोडाऊन परिसरातील साई प्रोव्हिजन या किराणा दुकानाचे शटर तोडून दुकानातील ४ हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली. याच परिसरातील नारायण मेडिकलचेही कुलूप तोडून ४०० रूपये चोरून नेले. रामनगर येथील पंचशील बौद्ध विहाराजवळ असलेल्या माधुरी किराणा दुकानाचे सर्वप्रथम मागचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर दरवाजा विटा लावून बुजविण्यात आला असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी समोरचेच दार तोडून दुकानामध्ये प्रवेश केला. दुकानातील ६०० रूपये नगद रकमेची चोरी केली.
दुकानदारांनी याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर पोलिसांनी श्वान पथक घटनास्थळावर आणले. त्याचबरोबर फिंगर प्रिंटही घेतल्या आहेत. मात्र सायंकाळपर्यंत एकाही चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे (नगर प्रतिनिधी)

व्यावसायिकांमध्ये धास्ती
४एका महिन्याच्या अंतराने सलग दुसऱ्यांदा दुकान फोडण्याची घटना घडली आहे. एक महिन्यांपूर्वी मूल मार्गावरील भारत गॅस व एचपी गॅस एजन्सी तसेच अष्टभूजा केमिकल्स कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी सव्वा लाखांच्या वर रक्कम लांबविली होती. त्यानंतर आता महिन्याच्या अंतरावरच पुन्हा दुकानफोडीच्या घटना वाढल्या आहे. चोरीच्या एकाही प्रकरणातील आरोपी पोलिसांना गवसलेले नाही.

आरोपी सीसीटीव्हीत कैद
४हनुमान ट्रेडिंग कंपनी या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. यातील कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाले आहेत. मात्र रात्र अंधार असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज स्पष्ट नाहीत. सदर फुटेज स्पष्ट करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. एक महिन्यापूर्वीही गॅस एजन्सीमध्ये झालेली चोरी शटरचे कुलूप तोडूनच झाली आहे. बुधवारच्या चोरीतही कुलूप तोडले.त्यामुळे एक महिन्यापूर्वी चोरी करणारेच चोरटे असावे, अशी शक्यता आहे.

Web Title: Four shops broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.