चार नगर पंचायतीसाठी आविसंने कंबर कसली
By Admin | Updated: October 24, 2015 01:14 IST2015-10-24T01:14:25+5:302015-10-24T01:14:25+5:30
अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी अपक्ष आ. दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ...

चार नगर पंचायतीसाठी आविसंने कंबर कसली
मुलचेरात काँग्रेस सोबत आघाडी : दीपक आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला
गडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी अपक्ष आ. दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आदिवासी विद्यार्थी संघाने पुन्हा निवडणुकीच्या मैदानात कंबर कसली आहे. सिरोंचा, एटापल्ली, अहेरी व मुलचेरा येथे आविसंने उमेदवार रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी आ. दीपक आत्राम यांनी स्वत: मतदारांसमोर जाणे पसंत केले असून एटापल्ली येथे १४ जागांवर आदिवासी विद्यार्थी संघ मैदानात आहे. तर सिरोंचा येथे १७ जागा आविसं लढवित आहे. अहेरी येथे ५ जागांवर आविसंने उमेदवार उतरविले असून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या आग्रहामुळे आविसंने मुलचेरा येथे काँग्रेस सोबत नगर पंचायत निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. या नगर पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दीपक आत्राम यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित असल्याचे प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनीही लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे.
प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे चांगले संबंध दीपक आत्राम यांच्याशी मुख्यमंत्रिपदाच्या काळात राहिलेले आहे. त्यामुळे आत्राम यांच्या प्रवेशात आता कोणतीही अडचण येणार नाही, असा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीत दीपक आत्राम यांनी मिळविलेले मताधिक्य पक्षासाठी केव्हाही फायदेच राहील, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे आविसं आगामी निवडणुकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)