आष्टी व आलापल्लीत चार लाखांची दारू जप्त
By Admin | Updated: February 1, 2017 00:44 IST2017-02-01T00:44:16+5:302017-02-01T00:44:16+5:30
आष्टी पोलिसांनी कालिनगर जंगलातून व अहेरी पोलिसांनी प्राणहिता नदी पात्रात वांगेपल्ली घाटावरून सुमारे चार लाख रूपये किमतीची मोहफुलाची दारू जप्त केली आहे.

आष्टी व आलापल्लीत चार लाखांची दारू जप्त
साहित्य ताब्यात : कालिनगर व वांगेपल्ली घाटावर कारवाई
आष्टी/आलापल्ली : आष्टी पोलिसांनी कालिनगर जंगलातून व अहेरी पोलिसांनी प्राणहिता नदी पात्रात वांगेपल्ली घाटावरून सुमारे चार लाख रूपये किमतीची मोहफुलाची दारू जप्त केली आहे.
पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कालिनगर जंगल परिसरात मोहफुलाची दारू निर्माण केली जात असल्याची माहिती आष्टी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून जंगल परिसरात शोध घेतला असता, जंगल परिसरात २५ प्लास्टिक ड्रममध्ये मोहफूल सळवा आढळून आला. या मोहफूल सळव्याची अंदाजे किमत ३ लाख ३६ हजार रूपये होते. त्याचबरोबर २५ ड्रमची किमत १४ हजार ४०० रूपये एवढी होते. सदर कारवाई पोलीस निरिक्षक दीपक लकडे, पोलीस उपनिरिक्षक संदीप कापडे, सहायक फौजदार फुलझेले, नायक पोलीस शिपाई मिलिंद ऐलावार, भुदेव झाडे, सखाराम माने, विनोद गौरकार यांनी केली.
अहेरी पोलिसांना प्राणहिता नदी पात्रात वांगेपल्ली घाटाजवळ दारूभट्टी आहे, अशी माहिती प्राप्त झाली. त्यानुसार अहेरी पोलीस ठाण्याचे निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी दुपारी ३ वाजता धाड टाकली. या ठिकाणी २० प्लास्टिक ड्रम भरलेला गुळाचा सळवा, १०० लिटर मोहफुलाची दारू, भट्टीसाठी लागणारे साहित्य यामध्ये आठ स्टिलचे हंडे, गुंड आदी साहित्य आढळून आले.
या मालाची एकूण किमत ५० हजार रूपये एवढी होते. सदर कारवाई पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विजय कोळेकर, पोलीस उपनिरिक्षक बगाटे, पोलीस हवालदार पवार, आडे, मनोज कुनघाडकर, भाऊराव टपाले, संजय बोल्लेवार, दुर्गे, कोरे, महिला पोलीस शिपाई महेश आत्राम, रोशना काळे यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)