चार किंगफिशर पक्षी आढळले मृतावस्थेत
By Admin | Updated: May 23, 2015 01:58 IST2015-05-23T01:58:46+5:302015-05-23T01:58:46+5:30
अहेरी तालुक्यातील उमानूर- गोलाकर्जी गावाच्या दरम्यान डांबरी रस्त्यावर चार किंगफिशर व अन्य दोन प्रकारचे पक्षी मृतावस्थेत गुरूवारी आढळून आले.

चार किंगफिशर पक्षी आढळले मृतावस्थेत
अहेरी : अहेरी तालुक्यातील उमानूर- गोलाकर्जी गावाच्या दरम्यान डांबरी रस्त्यावर चार किंगफिशर व अन्य दोन प्रकारचे पक्षी मृतावस्थेत गुरूवारी आढळून आले. सभोवतालच्या जंगलाचा शोध घेतल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता असून पक्ष्यांचा मृत्यू पाण्याअभावी झाला असावा, अशी शक्यता पक्षीतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
किंगफिशर हा दिसण्यास अतिशय आकर्षक पक्षी आहे. या पक्ष्याचे मुख्य खाद्य लहान मासे असल्याने या पक्ष्याचे वास्तव्य प्रामुख्याने तलावाशेजारी असल्याचे आढळून येते. उमानूर- गोलाकर्जी दरम्यान ज्या ठिकाणी पक्षी मृतावस्थेत आढळून आले. त्या ठिकाणाच्या अगदी जवळच तलाव असून सदर तलाव आता पूर्णपणे आटला आहे. तलाव आटल्याने या पक्ष्यांचे खाद्य संपले व निवाराही नष्ट झाला. त्यामुळे भुकेने व्याकुळ झालेल्या किंगफिशर पक्ष्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
डांबरी मार्गावर २०० मिटरच्या अंतरावर चार किंगफिशर व अन्य दोन असे एकूण सहा पक्षी मृतावस्थेत आढळून आले असले तरी प्रत्यक्ष सभोवतालच्या भागाचा शोध घेतल्यास शेकडो पक्षी मृतावस्थेत आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील तीन दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांसह पक्ष्यांनाही पाण्याची अत्यंत गरज भासत आहे. मात्र सभोवतालचे सर्वच जलसाठे कोरडे पडल्याने या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाण्याच्या भासाने किंगफिशरचा मृत्यू
उन्हाळ्यात दुपारच्या सुमारास समोरचे डांबर चमकत असून त्यावर पाणी असल्याचा भास निर्माण होतो. या भासामुळे किंगफिशर पक्षी डांबरी रस्त्यावर येऊन तप्त झालेल्या डांबरी रस्त्यावर बसल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.