हेडरीत चार हातपंप निकामी
By Admin | Updated: March 30, 2015 01:33 IST2015-03-30T01:33:40+5:302015-03-30T01:33:40+5:30
नक्षलीदृष्ट्या अतिसंवेदनशील हेडरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या हेडरी गावातच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

हेडरीत चार हातपंप निकामी
एटापल्ली : नक्षलीदृष्ट्या अतिसंवेदनशील हेडरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या हेडरी गावातच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाच बोअरवेल (हातपंप) पैकी चार हातपंप निकामी झाल्याचे प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. चार हातपंपांना अजिबात पाणीच येत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
या भागात शासनाच्या कोणत्याही विभागाचे अधिकारी जातच नसल्याने पाणी टंचाईची अडचण घेऊन ग्रामस्थांनी हेडरी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी विनोद नवसे यांना भेटून पाणी समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले. हेडरी गावात १०० ते दीडशे घर असून ५०० ते ७०० लोकसंख्या आहे. या गावात एकच शासकीय विहीर आहे. दीड वर्षापूर्वी एका व्यक्तीने या विहिरीत जीव देऊन आत्महत्या केली. परंतु त्यानंतर या विहिरीचे पाणी उपसा करण्यात आले नाही. त्यामुळे या विहिरीच्या पाण्याचा हेडरीच्या ग्रामस्थांना काहीही उपयोग होत नाही. ग्रामपंचायतीला तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेरीस गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली. गावकऱ्यांनी निवेदन दिले. त्यावेळी पोलीस उपनिरिक्षक राखोंडे, राजपूत, देशपांडे, सिरसास, दत्ता घुले, रणदिप काटेंगे, निलेश पुलधर, नागेश तुंकलवार आदी उपस्थित होते. नागरिकांनी प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)