सौर ऊर्जेच्या चार बॅटऱ्या फुटल्याने स्फोट; अनर्थ टळला
By Admin | Updated: November 30, 2015 01:13 IST2015-11-30T01:13:33+5:302015-11-30T01:13:33+5:30
सौर ऊर्जेच्या एकाच वेळी चार बॅटऱ्या अचानक फुटल्याने स्फोट झाल्याची घटना येथील ग्रामीण रूग्णालयात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

सौर ऊर्जेच्या चार बॅटऱ्या फुटल्याने स्फोट; अनर्थ टळला
एकच धावपळ : एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयातील घटना
एटापल्ली : सौर ऊर्जेच्या एकाच वेळी चार बॅटऱ्या अचानक फुटल्याने स्फोट झाल्याची घटना येथील ग्रामीण रूग्णालयात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी रूग्ण व नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नसून अनर्थ टळला.
शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून २०१५ च्या मे महिन्यात कोरचीच्या ग्रामीण रूग्णालयात सौर सिस्टिम बसविण्यात आली. याकरिता रूग्णालयातील बाह्य रूग्ण विभागानजीक मुख्य विद्युत वाहिनीजवळ सौर ऊर्जा सिस्टिमचे तब्बल ६० मोठ्या बॅटऱ्या लावण्यात आल्या. खोलीमध्ये एका बाजुने प्लायवूडने बॅटऱ्यांना योग्यरित्या बसविण्यात आले. मात्र या खोलीला दार लावण्यात आले नाही. सदर खोली बाह्य रूग्ण विभागाच्या जवळ असून तसेच या खोलीत रिकामी जागा असल्याने रूग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांचे ये-जा सुरू असते. शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एक आरोग्य कर्मचारी रूग्णाला मलमपट्टी करीत असताना त्याने स्टीलचा ताट बॅटरीवर ठेवला. लगेच सौर ऊर्जेच्या चारही बॅटऱ्या फुटल्याने स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने या बॅटऱ्यांमधून अॅसीड, बॅटरी वॉटर तसेच इतर साहित्य दूरवर फेकल्या गेले. या घटनेत एक आरोग्य कर्मचारी किरकोळ जखमी झाला. स्फोटाच्या प्रचंड आवाजामुळे रूग्णालय परिसरात भितीमय वातावरण निर्माण झाले व एकच धावपळ उडाली. सुदैवाने इतर बॅटऱ्या न फुटल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर लगेच एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद आकीनवार यांनी सौर ऊर्जेच्या बॅटऱ्या असलेल्या खोलीला दार बसविले. (तालुका प्रतिनिधी)
एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयात सोलर सिस्टिम बसविण्यात आली. मात्र या संदर्भात रूग्णालय प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे पत्र देण्यात आले नाही. बसविण्यात आलेली सोलर सिस्टिमची देखरेख व ती वापरावयाच्या नियमाची सुध्दा माहिती देण्यात आलेली नाही. रूग्णालयात सोलर सिस्टिम बसवून आठ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. सोलर सिस्टिम सुरू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कोणता कर्मचारी वा तंत्रज्ञ आहे. तसेच याच सोलर सिस्टिमच्या देखभालीची जबाबदारी कोणाकडे आहे याची सुध्दा मला माहिती नाही.
- डॉ. अरविंद आकीनवार,
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय एटापल्ली