हरिण शिकार प्रकरणात चार आरोपींना अटक
By Admin | Updated: January 28, 2016 01:11 IST2016-01-28T01:11:56+5:302016-01-28T01:11:56+5:30
३३ के व्हीच्या जिवंत विद्युत वाहिनीवर वायर टाकून हरणाची शिकार करणाऱ्या चार आरोपींना मुद्देमालासह कुरखेडाच्या वनाधिकाऱ्यांनी बुधवारी अटक केली.

हरिण शिकार प्रकरणात चार आरोपींना अटक
कुरखेडा : ३३ के व्हीच्या जिवंत विद्युत वाहिनीवर वायर टाकून हरणाची शिकार करणाऱ्या चार आरोपींना मुद्देमालासह कुरखेडाच्या वनाधिकाऱ्यांनी बुधवारी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तुकाराम पोटावी (६१) रा. खेडेगाव, नेहरू कुमरे (४३) रा. गेवर्धा, महादेव तुलावी (४७) रा. गेवर्धा, मुरलीधर आटे (४३) रा. खेडेगाव यांचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव-गेवर्धा जंगल परिसरालगत असलेल्या तुकाराम पोटावी यांच्या शेतातून जाणाऱ्या ३३ केव्हीच्या जिवंत विद्युत वाहिनीवर तार टाकून २५ जानेवारीच्या मध्यरात्री शिकार करण्यात आल्याची माहिती कुरखेडाचे वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार यांना मिळताच त्यांनी सदर जंगल परिसरात सापळा रचून चार आरोपींना मुद्देमालासह अटक केली.
आरोपीच्या घरातून हरणाचा कच्चा व तसेच काही शिजविलेला मांसासह तार, वायर, कुऱ्हाड, सुरी, विळा आदी साहित्य जप्त केले. चारही आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ (१) अ, ब, क, ड, ई, ४८ (अ), भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१) आय ३२ जे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी चारही आरोपींना कुरखेडाच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी गाजलवार, एल. एम. ठाकरे, एम. जे. ताजणे, पी. एम. मेनेवार, वनरक्षक बोरकुटे, धात्रक, मेटे, आतला, राऊत, गोपाल किरंगे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)