माजी आमदाराच्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग झाला सुकर
By Admin | Updated: October 10, 2015 01:37 IST2015-10-10T01:37:45+5:302015-10-10T01:37:45+5:30
अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याबाबत जिल्हास्तरावरील नेत्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या.

माजी आमदाराच्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग झाला सुकर
राऊत यांची शिष्टाई : दीपक आत्राम काँग्रेसी होणार
गडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याबाबत जिल्हास्तरावरील नेत्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु माजी खासदार मारोतराव कोवासे यांचा या बाबीला काही मुद्यांवर आक्षेप होता. त्यामुळे दीपक आत्राम यांच्या काँग्रेस प्रवेशात अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर अहेरी उपविभागातील काही काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन आत्राम विरोधकांना पक्षात प्रवेश करवून आणला होता व वडेट्टीवारांच्या उपस्थितीत आलापल्ली येथे पक्षाचा मेळावाही घेण्यात आला होता. त्यामुळे दीपक आत्राम यांचा काँग्रेस प्रवेश होते किंवा नाही याविषयी सर्वसामान्य नागरिक व काँग्रेसमध्येच संभ्रमाची स्थिती होती. मात्र माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गडचिरोली जिल्हा निरिक्षक म्हणून या प्रकरणात लक्ष घालून माजी खासदार कोवासे यांच्याशी दीर्घ चर्चा केली. दीपक आत्राम यांच्या पक्ष प्रवेशामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात पक्ष मजबूत होईल. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा ही बाब लक्षात घेऊन माजी खासदार कोवासे यांचाही रोष शांत करण्यात राऊत यांना यश आले. त्यानंतर सर्व काँग्रेस नेत्यांनी दीपक आत्राम यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर आत्राम यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे संकेत नेत्यांनी दिले. नगर पंचायत निवडणुकीनंतर याबाबत प्रवेशाचा मुहूर्त निघेल. (प्रतिनिधी)