वन कार्यालये माओवाद्यांच्या रडारावर

By Admin | Updated: September 20, 2015 01:58 IST2015-09-20T01:58:55+5:302015-09-20T01:58:55+5:30

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलिसांशी असलेल्या लढाईत माओवादी बॅकपूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले ..

Forest Offices on the Roar of Maoists | वन कार्यालये माओवाद्यांच्या रडारावर

वन कार्यालये माओवाद्यांच्या रडारावर

कोट्यवधींची हानी : दोन महिन्यांत चार कार्यालये जाळली; वन कर्मचाऱ्यांनाही नक्षलवाद्यांनी पत्रकातून दिली तंबी
गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलिसांशी असलेल्या लढाईत माओवादी बॅकपूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले असताना सध्या माओवाद्यांनी वन विभागाच्या कार्यालयांना टार्गेट करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यात वन विभागाची चार कार्यालये जाळली आहेत. याशिवाय काही ग्रामपंचायत कार्यालयांचीही नासधूस माओवाद्यांकडून करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात पोलीस यंत्रणा माओवाद्यांवर वरचढ झाली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला सोडून आता माओवाद्यांनी वन विभागाला आपले लक्ष्य केले आहे. पोलीस यंत्रणेएवढेच दुर्गम भागात वन विभागाचे काम गडचिरोली जिल्ह्यात आहे. गेल्या तीन महिन्यात माओवाद्यांकडून वन विभागाच्या कार्यालयांची जाळपोळ केली जात आहे.
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा वन परिक्षेत्र कार्यालयाला १५ जुलै रोजी आग लागली होती. या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. त्याचबरोबर दस्तावेजही जळाले. अहेरी तालुक्यात पेरमिली व देचलीपेठा येथीलही वन विभागाच्या कार्यालयाला नक्षल्यांनी आग लावली. देचलीपेठा येथील आगीत १५ लाख रूपयांचे वन विभागाचे नुकसान झाले. सिरोंचा तालुक्यात झिंगानूर येथील वन परिक्षेत्र कार्यालयाला आग लावल्याने या कार्यालयाचे १२ लाख रूपयांचे नुकसान झाले. वन विभागाचे सुमो वाहनसुध्दा या आगीत जळून भस्म झाले. तर दुसरे एक चारचाकी वाहन क्षतिग्रस्त झाले आहेत.
माओवाद्यांनी कधी नव्हे ते सलग वन कार्यालयांना लक्ष्य केल्यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये दुर्गम भागात काम करताना दहशत पसरली आहे.
याशिवाय धानोरा तालुक्यात दुर्गापूर येथील ग्रामपंचायतीची माओवाद्यांनी जाळपोळ केली आहे. वन विभागामार्फत दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जातात. त्यामुळे या विभागावर आपली दहशत बसविण्याचा माओवाद्यांचा हा प्रयत्न आहे. माओवादी विकासाला कायम विरोध करण्यासाठी असे कृत्य करीत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Forest Offices on the Roar of Maoists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.