वनाधिकाऱ्यांनी तोडली शेतातील झाडे
By Admin | Updated: July 5, 2017 01:20 IST2017-07-05T01:20:40+5:302017-07-05T01:20:40+5:30
एकीकडे शासनाकडून नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी आवाहन केले जाते. तर दुसरीकडे चक्क वनाधिकाऱ्यांकडूनच बंगाली बांधवांच्या शेतातील आंब्यांची मोठमोठी झाडे तोडली जात आहे,

वनाधिकाऱ्यांनी तोडली शेतातील झाडे
कारवाई करा : आमदारांसह बंगाली बांधवांची जिल्हा कचेरी व एसपी कार्यालयावर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकीकडे शासनाकडून नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी आवाहन केले जाते. तर दुसरीकडे चक्क वनाधिकाऱ्यांकडूनच बंगाली बांधवांच्या शेतातील आंब्यांची मोठमोठी झाडे तोडली जात आहे, असा आरोप करीत या प्रकरणावर आक्रमक होऊन गडचिरोलीचे आ. डॉ. देवराव होळी यांच्यासह रामकृष्णपूर येथील बंगाली बांधवांनी थेट जिल्हा कचेरी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मंगळवारी धडक देऊन संबंधित दोषी वनाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनात आ. डॉ. देवराव होळी व बंगाली बांधवांनी म्हटले आहे की, चामोर्शी तालुक्याच्या रामकृष्णपूर येथील बंगाली बांधव गेल्या २५ वर्षांपासून पडिक जमिनीवर अतिक्रमण करून शेती व्यवसाय करीत आहेत. सदर जमिनीबाबत शासनस्तरावर पत्रव्यवहार सुरू असून अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू आहेत. मात्र या जमिनीसंदर्भात अद्यापही कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने सदर जमिनीचे प्रकरण कार्यालयीन स्तरावर प्रलंबित आहेत. असे असताना मार्र्कंडा (कंसोबा) च्या वन परिक्षेत्र अधिकारी व इतर वनाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी बंगाली बांधवांच्या शेतात उभी असलेली आंब्यांची मोठी झाडे तोडली. तसेच शेतातील धान पिकाची नासधूस केली. याशिवाय शासनाने पट्टा दिलेल्या शेतीकडे जाणारा रस्ता वनाधिकाऱ्यांनी बंद करून टाकला आहे. त्यामुळे अतिक्रमित शेतावर जाण्यास बंगाली बांधवांना अडचण निर्माण झाली आहे. अशा प्रकारे शेतातील वृक्षतोड करणाऱ्या व पिकांची नासधूस करणाऱ्या संबंधित दोषी वनाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांच्यासह बंगाली बांधवांनी केली आहे.
या संदर्भात आ. डॉ. देवराव होळी व बंगाली बांधवांनी जिल्हाधिकारी नायक व अप्पर पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली.