जंगल आगीस वनरक्षक, वनपालांना जबाबदार धरणार
By Admin | Updated: February 4, 2016 01:29 IST2016-02-04T01:29:55+5:302016-02-04T01:29:55+5:30
वनक्षेत्रात कोणत्याही इसमाकडून बेकायदेशीरीत्या वणवा लावणे, जंगलाची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने प्रयत्न करावे,

जंगल आगीस वनरक्षक, वनपालांना जबाबदार धरणार
पी. कल्याणकुमार यांचा इशारा : आलापल्लीत आढावा बैठक
आलापल्ली : वनक्षेत्रात कोणत्याही इसमाकडून बेकायदेशीरीत्या वणवा लावणे, जंगलाची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने प्रयत्न करावे, ज्या गावालगत जंगल क्षेत्रात आग लागल्यास त्या क्षेत्रात कार्यरत वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्राधिकारी यांना जबाबदार गृहीत धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार, असा इशारा गडचिरोलीचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी दिला.
आलापल्ली वन विभागाच्या सभागृहात सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भामरागडचे उपवनसंरक्षक बाला, आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना तसेच आलापल्ली वन विभागातील वनपरिक्षेत्राधिकारी क्षेत्र सहाय्यक आदी उपस्थित होते. यावेळी पी. कल्याणकुमार यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत वन विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या क्षेत्रात नरेगाची कामे अपूर्ण आहेत, त्यांनी ३१ मार्च २०१६ पर्यंत काम पूर्ण करून विहीत वेळेत निधी खर्च करावा, अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली. वन विभागामार्फत सुरू असलेली विकास कामे व निधी खर्चात वनपरिक्षेत्राधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास आपण खपवून घेणार नाही, प्रसंगी कारवाई करणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)
निस्तार कुपातून रोजगार द्या
वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निस्तार कुपाच्या बाबत स्थानिक नागरिकांमध्ये चुकीच्या गैरसमजुती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांचे प्रबोधन करावे, निस्तार कुपाच्या माध्यमातून वन विभाग स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देऊ शकते, हे पटवून देण्याची गरज आहे. एक निस्तार कूप सरासरी ५ ते २० कोटी रूपयापर्यंतचा रोजगार स्थानिकांना देऊ शकते. एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्याच्या विचार केल्यास वर्षाला १०० कोटी रूपयांचे वार्षिक उत्पन्न वन विभाग निर्माण करू शकते. यातून प्रत्येक कुटुंबाला ५ ते २० हजार रूपयांचे वार्षिक उत्पन्न उपलब्ध करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.