वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: February 8, 2017 02:32 IST2017-02-08T02:32:13+5:302017-02-08T02:32:13+5:30
आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या अहेरी तहसील कार्यालयाच्या मागील गडअहेरी, गिट्टी खदान व

वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले
दोन वर्षानंतर कारवाई : झोपड्या व पक्की घरे पाडली; गुन्हे दाखल
अहेरी : आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या अहेरी तहसील कार्यालयाच्या मागील गडअहेरी, गिट्टी खदान व प्राणहिता कॅम्प समोरील वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून काही नागरिकांनी झोपड्या उभारल्या होत्या. तर काहींनी पक्के घरेही बांधली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन जमिनीवरील कच्च्या स्वरूपाच्या झोपड्या काढल्या आहेत.
वन विभागाने दोन वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या वन जमिनीवरील झोपड्या हटविल्या होत्या. मात्र पुन्हा काही दिवसातच त्याच ठिकाणी नागरिकांनी नव्याने झोपड्या उभ्या केल्या. झोपड्या उभारल्या जात असताना वन विभागाने बघ्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच गेले. मंगळवारी अचानक अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. अचानक वन विभागाला कशी जाग आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही नागरिक वन जमिनीवर अतिक्रमण करून काही दिवसातच सदर झोपड्या दुसऱ्या व्यक्तीला विकत असल्याचेही दिसून येत आहे.
वन विभागाने धर्मा पोचम सुरिला, वसंता मडावी, वनराज झाडे, अनिल झाडे, पोचन्ना कोटावार, सोनी मडावी, राजू गावडे, सूरज दहागावकर यांच्या झोपड्या हटवून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सदर कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी प्रभाकर आत्राम, अतिक्रमण पथक अधिकारी एस. एस. आत्राम, वनपाल टी. चंद्रशेखर, जी. एल. नवघरे, मारखंडी मुत्तेवार, एल. एस. मडावी, सुरेश पुस्पनुरवार, वनरक्षक आर. एस. मडावी, प्रकाश नंदगिरवार, एस. एस. गुरनुले यांच्यासह पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली.