वन विभागाची हेल्पलाईन बंद
By Admin | Updated: April 23, 2016 01:22 IST2016-04-23T01:22:43+5:302016-04-23T01:22:43+5:30
जंगलातील वनवा तसेच विविध प्रकारच्या वनगुन्ह्यांबाबत नागरिकांकडून तत्काळ माहिती मिळावी या उद्देशाने वन

वन विभागाची हेल्पलाईन बंद
वन गुन्हे रोखण्यात अडचण : तीन वन विभागासाठी एकच क्रमांक
आलापल्ली : जंगलातील वनवा तसेच विविध प्रकारच्या वनगुन्ह्यांबाबत नागरिकांकडून तत्काळ माहिती मिळावी या उद्देशाने वन विभागाने आलापल्ली येथे हेल्पलाईन क्रमांक सुरू केला होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सदर क्रमांक बंद असून तो नादुरूस्त स्थितीत आहे. परिणामी हेल्पलाईनअभावी वनवे तसेच वनगुन्हे रोखण्यात वन विभागाला अडचणी येत आहेत.
आलापल्ली, भामरागड, सिरोंचा या तिन्ही वन विभागातील वनतस्करी, अवैध वृक्षतोड, शिकार तसेच वनवे आणि कोणत्याही वनगुन्ह्यांची अथवा घटनेची माहिती नागरिकांकडून तत्काळ प्राप्त व्हावी यासाठी वन विभागाने या तिन्ही वन विभागासाठी आलापल्ली येथे एकच हेल्पलाईन क्रमांक सुरू केला. मात्र सदर हेल्पलाईन क्रमांक गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. वन विभागामार्फत याबाबतची तक्रार दूरसंचार विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र या क्रमांकाची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही, असे आलापल्ली येथील वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.
सध्या उन्हाळा असल्याने आलापल्लीसह तिन्ही वन विभागाच्या वनक्षेत्रात वणवा लागणे, अवैध शिकारी, अवैध वृक्षतोड आदी प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक बंद असल्याने तक्रारी प्राप्त होत नसल्याने वनगुन्हे घडतच आहेत. (वार्ताहर)