टीपी देण्यास वन विभागाची टाळाटाळ
By Admin | Updated: July 5, 2017 01:17 IST2017-07-05T01:17:21+5:302017-07-05T01:17:21+5:30
आष्टी परिसरातील धन्नूर, चौडमपल्ली, चपराळा, चंदनखेडी, रामनगट्टा, सिंगमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, मार्र्कंडा, इल्लूर या गावातील नागरिकांनी यावर्षी स्वत:हून तेंदूपत्ता संकलन केले.

टीपी देण्यास वन विभागाची टाळाटाळ
लाखोंचा तेंदूपत्ता पडून : चपराळा अभयारण्यांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांचा संघर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आष्टी परिसरातील धन्नूर, चौडमपल्ली, चपराळा, चंदनखेडी, रामनगट्टा, सिंगमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, मार्र्कंडा, इल्लूर या गावातील नागरिकांनी यावर्षी स्वत:हून तेंदूपत्ता संकलन केले. मात्र तेंदूपत्त्याच्या वाहतुकीसाठी वन विभागाने टीपी देण्यास नकार दिला असल्याने लाखो रूपयांचा तेंदूपत्ता गावातच पडून आहे.
वन हक्क कायद्यानुसार धन्नूर, चौडमपल्ली, चपराळा, चंदनखेडी, रामनगट्टा, सिंगमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, इल्लूर, मार्र्कंडा रै. या गावांना जमिनीचे पट्टे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर धन्नूर व चंदनखेडी या दोन गावाला ९० हेक्टरचा सामुहिक वनदावा मंजूर केला आहे. तसेच ही सर्व गावे पेसा कायद्यांतर्गत येत असल्याने वनोपज गोळा करून ती विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. त्यानुसार या गावातील गावकऱ्यांनी यावर्षी तेंदू संकलन केले. त्यावेळी वन विभाग व गावकरी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. या ठिकाणी अभयारण्य असल्याचे कारण सांगून वन विभागाने तेंदूपत्ता संकलन करू देण्यास नकार दिला होता. आता टीपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. गावकरी, जिल्हाधिकारी व वन विभागाचे अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत टीपी देण्याच्या सूचना केल्या. मात्र अजूनपर्यंत टीपी दिली नाही. त्यामुळे लाखो रूपयांचा तेंदूपत्ता खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धन्नूर येथे वीज पडून दीपक कुसनाके, आकाश कुसनाके, रमेश कुसनाके, लक्ष्मण तुरे, विलास आत्राम, लचमा कन्नाके, दिवाकर तलांडे हे जखमी झाले. मात्र शासनाने त्यांना किरकोळ मदत दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांची भेट घेतली असता, या दोन प्रमुख समस्या नागरिकांनी सांगितल्या. तेंदूपत्ता वाहतुकीसाठी टीपी द्यावी, अन्यथा काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, तालुका अध्यक्ष शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, किसन शेट्ये, संजय पंदिलवार, शंकर आकरेड्डीवार, दिलीप शेख, शंकर आत्राम, मोतीराम कुसनाके, तुकाराम शेडमाके, नामदेव कुसनाके, जानकीराम कुसनाके, वसंत तोरे, कालिदास कुसनाके, जयराम कन्नाके, सदाशिव पेंदाम, सखाराम पेंदाम, मानिक मडावी व गावकरी उपस्थित होते.