वन विभागाने फुलविली रोपवाटिका
By Admin | Updated: May 25, 2015 01:57 IST2015-05-25T01:57:31+5:302015-05-25T01:57:31+5:30
येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने पर्यायी वनीकरण योजनेंतर्गत १ लाख ३० हजार वृक्षांची ...

वन विभागाने फुलविली रोपवाटिका
चामोर्शी : येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने पर्यायी वनीकरण योजनेंतर्गत १ लाख ३० हजार वृक्षांची रोपवाटिका तर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत १ लाख ५० हजार वृक्षांची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे.
रोपवाटिकेतील वृक्ष नागरिकांना शेतात, कार्यालयात, जंगल परिसर, रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या रोपवाटिकेची देखभाल व निगा राखण्यासाठी पाच पुरूष व ३० महिला मजूर कामावर ठेवण्यात आले आहेत. दररोज रोपांना पाणी देणे व निंदन काढण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही येथील मजुरांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे.
यातील रोपटे लहान असल्याने कडक उन्हापासून त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी हिरवी जाळी लावण्यात आली आहे. नियमितपणे योग्य पद्धतीने काळजी घेत जात असल्याने उन्हाळ्यातही येथील रोपवाटिका हिरवीकंच असल्याचे दिसून येते. यासाठी मजुरांसोबत वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, क्षेत्र सहाय्यक संजय पेंपकवार, वनरक्षक सुप्रिया गेडाम यांच्यासह कार्यालयाचे कर्मचारीही विशेष मेहनत घेत आहेत.
सदर रोपवाटिका तहसील कार्यालयासमोरील घोट मार्गावर असलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात तयार करण्यात आले आहे. येथील हिरवेकंच रोपटे ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. पावसाळ्यात अनेक नागरिक झाडांची लागवड करण्यास इच्छुक असतात. मात्र त्यांना रोपटे मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)