दरवर्षी घटताहेत जंगलाचे क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:56+5:302021-02-05T08:51:56+5:30
गडचिरोली : तस्करांमार्फत हाेणारी जंगलताेड, वनहक्क पट्टा मिळविण्यासाठी स्थानिक नागरिकांमर्फत केली जाणारी वृक्षताेड तसेच वयाेवृद्ध झालेली झाडे करपत ...

दरवर्षी घटताहेत जंगलाचे क्षेत्र
गडचिरोली : तस्करांमार्फत हाेणारी जंगलताेड, वनहक्क पट्टा मिळविण्यासाठी स्थानिक नागरिकांमर्फत केली जाणारी वृक्षताेड तसेच वयाेवृद्ध झालेली झाडे करपत असल्याने दरवर्षी गडचिराेली जिल्ह्यातील जंगलाचे प्रमाण घटत चालले आहे. दस्तुरखुद्द भारतीय वन सर्वेक्षण विभागाने यावर शिक्कामाेर्तब केले आहे.
भारतीय वन सर्वेक्षण विभागामार्फत दर दोन वर्षांनी इंडिया स्टेट रिपोर्ट प्रकाशीत केला जातो. २०१९ चा रिपोर्ट अलीकडेच जाहीर झाला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जंगल मागील आठ वर्षांत सुमारे १७७.०६ किमीने घटले असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी जंगलाचे क्षेत्र घटत चालले असल्याने ही धोक्याची घंटा आहे.
राज्यात सर्वाधिक जंगल गडचिरोली जिल्ह्यात आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जंगलाचे महत्त्व असल्याने शासन जंगल संरक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. तरीही मागील काही वर्षांत विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने जंगलाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौ.कि.मी. आहे. २०११च्या इंडिया स्टेट रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण जंगलाचे क्षेत्र १० हजार ९४ चौ.किमी दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्केवारीमध्ये हे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे आहे.
दरवर्षी जंगलाचे प्रमाण घटत चालले असल्याचे या रिपोर्टच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०१९ च्या रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाचे क्षेत्र ९९१६.९४ चौ.किमी असल्याचे दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या जंगलाचे प्रमाण ६८.८१ टक्के झाले आहे. २०११ ते २०१९ या आठ वर्षांच्या कालावधीत सुमारे १७७ टक्के जंगल कमी झाले आहे.