भाजप सदस्यता नोंदणी अभियान जोमाने राबवा
By Admin | Updated: November 30, 2014 23:05 IST2014-11-30T23:05:25+5:302014-11-30T23:05:25+5:30
भारतीय जनता पार्टीला जगात क्रमांक १ चा पक्ष म्हणून स्थापित करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबवा, असे आवाहन नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी केले.

भाजप सदस्यता नोंदणी अभियान जोमाने राबवा
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीला जगात क्रमांक १ चा पक्ष म्हणून स्थापित करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबवा, असे आवाहन नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी केले. भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, पूर्व विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, भाजपा संघटन महामंत्री बाबुराव कोहळे, प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, सदानंद कुथे, प्रकाश सा. पोरेड्डीवार, नानाभाऊ नाकाडे, रवींद्र ओल्लालवार, दामोधर अरगेला, सुधाकर येनगंधलवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शालुताई दंडवते, देसाईगंजचे नगराध्यक्ष श्याम उईके, दिलीप सारडा, प्रकाश अर्जुनवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना खासदार अशोक नेते म्हणाले, पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यात किमान १ लाख सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन करून प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर किमान १०० सदस्य तयार करण्याचे आवाहन केले. डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी सदस्य नोंदणी अभियानाची माहिती देऊन मंडळ स्तरावर कार्यशाळा आयोजित करून अधिकाधिक कार्यकर्त्यांचा सहभाग नोंदणी अभियानात करण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यशाळेत आमदार क्रिष्णा गजबे यांनी कार्यकर्त्यांनी सदैव तत्पर राहावे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, संचालन जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत भृगुवार, आभार जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)