गतिमानतेवर भर : सीईओंनी लावला गुप्त दौऱ्यांचा सपाटा
By Admin | Updated: July 12, 2014 01:11 IST2014-07-12T01:11:26+5:302014-07-12T01:11:26+5:30
तालुका, ग्रामीण व दुर्गम भागातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक विभागाच्या कामात दिरंगाई निर्माण झाली आहे.

गतिमानतेवर भर : सीईओंनी लावला गुप्त दौऱ्यांचा सपाटा
गडचिरोली : तालुका, ग्रामीण व दुर्गम भागातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक विभागाच्या कामात दिरंगाई निर्माण झाली आहे. हे लक्षात आल्यानंतर जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी गेल्या चार-पाच दिवसापासून दुर्गम तालुक्यात गुप्त दौऱ्यांचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील कामचुकार अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत.
जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी बुधवारी धानोरा या दुर्गम तालुक्यात गुप्त दौरा करून विकासकामांची पाहणी केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, पाण्याच्या सोयीसुविधा आदी बाबींचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी धानोरा तालुक्यात पेंढरी, गट्टा, एडमपायली व अन्य गावांमध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच पाणी पुरवठ्याच्या सोयींची पाहणी केली. प्राथमिक शाळेतील गुणवत्तेचीही त्यांनी तपासणी केल्याची माहिती आहे.
शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी कुरखेडा तालुक्यातील दुर्गम भागात गुप्त दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीची तपासणी केली. यावेळी त्यांना गावपातळीवरील प्रशासनात अनेक त्रूट्या आढळून आल्या. (स्थानिक प्रतिनिधी)