गडचिरोलीत पुरामुळे हाहाकार; चार ते पाच गावे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 21:47 IST2022-07-09T21:45:42+5:302022-07-09T21:47:34+5:30
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर असलेल्या गावांमध्ये पाण्याचा वेढा पडला आहे. गड्डीगुडम परिसरातील ९० टक्के शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.

गडचिरोलीत पुरामुळे हाहाकार; चार ते पाच गावे पाण्याखाली
गडचिरोली : आलापाली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर असलेले नंदीगाव, तिमरम, निलमगुडम, गोलाकर्जी या गावांमध्ये नाल्याचे पाणी शिरले होते. पहाटे ३ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत या गावांमधील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला होता. गुड्डीगुडम परिसरातील ९० टक्के शेतजमीनही पाण्याखाली असल्याने शेतात टाकलेले कापूस व धान वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निलमगुडम येथे तीन घरांमध्ये पाणी शिरल्याने गावातील नागरिकांचे दैनंदिन जीवनात वापरले जाणारे साहित्य पूर्णतः भिजले आहे. तिमराम येथे दोन घरांत पाणी शिरले. गोलकर्जी येथे तर अर्धे गाव पाण्यात असल्याचे समजते. मोसम आणि नंदीगावादरम्यान झिमेला नाल्याच्या रपट्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत विस्कळीत झाली होती.
पुरामुळे वाहून गेलेल्या शेतातील पिकांचा मोका पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या अस्मानी संकटाने परिसरातील शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत.
गावकऱ्यांच्या पुढाकाराने केला रस्ता मोकळा
सिरोंचा महामार्गावर असलेल्या नंदीगाव येतील रल्लावागू नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने त्या ठिकाणी पाण्यात वाहून येऊन एक मोठे झाड पुलावर अडले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. नंदीगाव येथील नागरिकांच्या मदतीने ते झाड तोडून बाजूला सरकवून रस्ता मोकळा करण्यात आला. देवलमारी ग्रामपंचायत सदस्य हरीश गावडे यांनीही त्यासाठी मोलाचे सहकार्य केले.