राष्ट्रीय महामार्गासाठी वडसात होणार उड्डाण पूल
By Admin | Updated: March 7, 2016 01:00 IST2016-03-07T01:00:13+5:302016-03-07T01:00:13+5:30
वर्षभरापूर्वी घोषित झालेल्या साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गासाठी वडसात होणार उड्डाण पूल
साकोली-सिरोंचा मार्ग : बायपासचा मुद्दा संपुष्टात
देसाईगंज : वर्षभरापूर्वी घोषित झालेल्या साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सेतू भारतम् योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण योजनेत वडसा रेल्वे क्रॉसिंगचा समावेश करण्यात आला असल्याने देसाईगंज येथील बायपासचा मुद्दा पूर्णत: संपुष्टात आला आहे. त्यामुळे साकोली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गासाठी देसाईगंज येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाण पूल होणार आहे.
सेतू भारतम् योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्गांना पुढील चार वर्षात रेल्वे क्रॉसिंगमुक्त करण्यात येणार आहे. यासाठी २०८ रेल्वे क्रॉसिंगची निवड करण्यात आली असून या ठिकाणी रेल्वे फाटक पूल बनविण्यात येणार आहे. या योजनेत महाराष्ट्र राज्यातील १२ मार्गावरील फ्लाईओवरचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. या उड्डाण पुलामुळे रेल्वे क्रॉसिंग मुक्त होणार आहे. गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील एकमेव वडसा रेल्वे स्टेशनचा सेतू भारतम् योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील देसाईगंज येथील बायपासचा मुद्दा संपुष्टात आला आहे.
साकोली-देसाईगंज-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसाळ्यासह तीन महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे. या मार्ग निर्मितीमुळे परिसरातील दळणवळण, उद्योगधंदे व विकासाला चालना मिळणार आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग शहरी अथवा बायपास मार्गातून नेण्याबाबतचे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. सदर राष्ट्रीय महामार्गाची रूंदी २४.२४ मीटरची राहणार असल्याची माहिती यापूर्वी विभागामार्फत देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)